मुंबई : चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून २३ वर्षीय विवाहितेची दोन लाखांना फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विक्रोळी परिसरात राहण्यास असलेल्या तक्रारदार खासगी कंपनीत नोकरीला आहेत. चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी नोकरी संबंधित संकेतस्थळावर त्यांनी नोंदणी केली आहे. अशातच गुरुवारी अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलधारकाने त्यांना नोकरी देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी एका लिंकवर तपशील भरण्यास सांगितला. त्यांनीही विश्वास ठेवून माहिती भरली. त्यात बँक खात्यासंबंधी तपशील भरला. पुढे ठगाच्या सांगण्यावरून मोबाइलवर आलेले ओटीपी क्रमांकही शेअर केले.
फोन ठेवताच मोबाइलवर आलेल्या संदेशाने महिलेला धक्का बसला. यात त्यांच्या खात्यातून दोन लाख रुपये काढण्यात आल्याचे समजले. त्यांनी संबंधितांकडे चौकशी करताच, त्याने पुढे कॉल घेणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने एमआरए मार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली.
गोपनीय माहिती शेअर करू नका...अशा प्रकारे फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने, पोलिसांकडून अनोळखी व्यक्तीला माहिती शेअर करू नका, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाउंटवरूनदेखील याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.