पिंपरी : घर बांधण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये, असा विवाहितेकडे तगादा लावला. त्यासाठी तिचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.सुजाता ऊर्फ आरोही अभिजित गायकवाड (वय २३, रा. काशिदनगर, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. अभिजित गुंडू गायकवाड, गुंडू शंकर गायकवाड, शारदा गुंडू गायकवाड, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच दीपा आणि मेघा (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अशोक निवृत्ती कांबळे (वय ५२, रा. देगाव रोड, सोलापूर) यांनी मंगळवारी (दि. ११) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी सुजाता उर्फ आरोही हिचा सासरच्यांनी छळ केला. तुझ्या लग्नात घरच्यांनी काही दिले नाही, असे बोलून माहेरच्यांबाबत अपमानास्पद बोलून आरोपी यांनी विवाहितेला त्रास दिला. तसेच हडपसर येथील प्लॉटवर घर बांधायचे असून त्यासाठी माहेराहून पैसे घेऊन ये, असा आरोपी यांनी तगादा लावला. या त्रासाला कंटाळून तिने सोमवारी (दि. १०) सकाळी आत्महत्या केली. आरोपी यांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, अशी तक्रार तिच्या वडिलांनी केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; घर बांधण्यासाठी केली जात होती पैशांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 8:18 PM
घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणावे यासाठी केला विवाहितेचा छळ; सांगवीतील घटना
ठळक मुद्देसासरच्या पाच जणांवर गुन्हा