प्रेमविवाह केल्यानंतर घरजावई बनून राहणाऱ्या युवकाने गुरुवारी सकाळी पत्नीचा मानेवर स्क्रू ड्रायव्हरने वार करून तिची हत्या केली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला परंतु दुपारी स्वत:ला निर्दोष असल्याचं सांगत थेट पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसाने या आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मुलीच्या आईने जावयावर आरोप लावले आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. गाजियाबाद जिल्ह्यातील बयाना गावातील ही घटना आहे.
पोलिसांनी सांगितले की, राजकुमारी तिचा पती दीपकसोबत माहेरी राहते. बुधवारी रात्री दीपक आणि राजकुमारीचं जोरदार भांडणं झालं. त्यावेळी आई आणि भावाने दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघांचा वाद विकोपाला गेला. त्यानंतर आई आणि भाऊ दोघे झोपण्यासाठी छतावर निघून गेले. सकाळी जेव्हा ते खाली आले तेव्हा राजकुमारी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं. त्यावेळी दीपक जागेवर नव्हता. मुलीची अवस्था पाहून आई जोरजोरात रडू लागली. हा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही तिथे पोहचले. त्यानंतर घटनेची स्थानिकांना माहिती देण्यात आली.
मुलीच्या हत्येसाठी आईने जावयावर आरोप केले आहेत. मात्र गुरुवारी दुपारी जावई स्वत: पोलीस स्टेशनला हजर होऊन निर्दोष असल्याचं सांगितले. पोलिसांनी सध्या त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २५ वर्षीय राजकुमारीने इंद्रगढी येथे राहणाऱ्या दीपकसोबत एक वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. दीपकच्या घरच्यांना हे लग्न मंजूर नव्हतं. म्हणून त्याला घराबाहेर काढलं. त्यानंतर तो घरजावई बनून राजकुमारीच्या घरी राहू लागला. राजकुमारीसोबत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असे. दीपकने अनेकदा राजकुमारीला मारहाणही केली. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. संशयिताला ताब्यात घेतलं आहे. चौकशी सुरू आहे असं पोलीस म्हणाले.
सासूचा जावयावर गंभीर आरोप
मुलीचं लग्न लॉकडाऊनमध्ये झालं होतं. तेव्हा हुंडा देऊ शकली नाही. लॉकडाऊन उघडल्यानंतर हुंडा देऊ असं बोलणं झालं होतं. हुंड्यात बुलेट गाडी, अडीच लाख रुपये आणि फर्निचरचा समावेश होता. दीपकने राजकुमारीकडे हुंड्यांसाठी मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्याने तो राजकुमारीचं मानसिक आणि शारीरीक शोषण करत होता. जे पाहून राजकुमारीच्या घरच्यांनी फर्निचरचं सामान त्याला दिलं होतं. परंतु बुलेट आणि पैसे न दिल्याने दीपक संतापला होता. त्यानंतर राजकुमारीला मारहाण केली. मागणी पूर्ण न होत असल्याने दीपक पत्नी राजकुमारी, तिची आई आणि भावाशी भांडत होता.
आरोपीच्या जबाबात गोंधळ
पोलिसांकडे पोहचलेल्या पती दीपकने दिलेल्या जबाबात म्हटलंय की, तो पहाटे ४ वाजता घरातून बाहेर पडला होता. त्याच्या जाण्यानंतर ही घटना घडली आहे. परंतु पोलीस म्हणाले की, पहाटे ४ वाजता पाऊस पडत होता आणि तेव्हा अंधार असल्याने पोलिसांना या जबाबात संशय वाटला. तर पोलिसांनी राजकुमारीच्या भावाचे कपडे जप्त केलेत. त्यावर रक्ताचे डाग आढळले आणि कपडेही फाटले आहेत. त्यामुळे पोलीस सर्व गोष्टींचा तपास करत आहेत.