ठाणे : रिक्षाखरेदीसाठी माहेरहून पैसे आणावेत म्हणून पती कुणाल आंबवणे याच्यासह सासरच्या मंडळींनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार २३ वर्षीय विवाहितेने शनिवारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिवाईनगर येथे राहणाऱ्या आपल्या आईवडिलांकडे सध्या ही विवाहिता वास्तव्याला आहे. भिवंडीतील कासारआळीमध्ये राहणारे कुणाल यांच्याशी तिचा ३० डिसेंबर २०१८ रोजी विवाह झाला. लग्नाच्या १५ दिवसांनी वडिलांनी मानपान न केल्याच्या कारणावरून सासू मीना यांनी टोमणे मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर पतीला रिक्षा घेता यावी, यासाठी माहेरहून पैसे आणावेत म्हणून पतीसह सासू, नणंद मानसी महाडिक आणि तिचे पती वैभव यांनी वारंवार छळ सुरू केला. तसेच तिच्या वडिलांचे शिवाईनगर येथील घर त्यांच्या नावावर करण्यासाठीही त्यांनी तिच्यावर दबाव आणला. वैभव महाडिक यांनीही मारहाण केली. त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला आणखी त्रास दिला. ३० डिसेंबर २०१८ ते २६ आॅगस्ट २०१९ या काळात हा त्रास सुरूच होता.
लग्नातील दागिन्यांचाही या मंडळींनी अपहार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर घरातूनही तिला बाहेर काढले. या सर्वच त्रासाला कंटाळून या विवाहितेने अखेर याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात १४ डिसेंबर २०१९ रोजी सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.