हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील नारनौलमध्ये एका शहीद जवानाच्या पत्नीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी भिंतीवरून उडी मारून घरात घुसले, ज्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून, नांगल चौधरी पोलीस ठाण्यात रविवारी ४ ते ५ तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोस्तपूर गावातील रहिवासी कृष्ण कुमार यांनी सांगितलं की, ते भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. त्यांचे वडील खुसीराम यादव शहीद झाले. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास त्यांची आई प्रेमदेवी घरी एकटीच होती. याच दरम्यान, त्याचा शेजारी रोहित, जो मूळचा राजस्थानातील नीमराणा येथील नहरेडा खुर्द गावचा रहिवासी होता, तो अचानक त्याच्या ४ ते ५ साथीदारांसह काठ्या घेऊन आला. घराच्या भिंतीवरून उडी मारून आत आले.
कृष्ण कुमार म्हणाले की, “घरात प्रवेश केल्यानंतर तरुणांनी माझ्या आईशी गैरवर्तन केलं. त्यांनी तिच्यावर लाठ्या-काठ्यांनी क्रूरपणे हल्ला केला. आईला घराबाहेर काढून फरफटत चौकात आणलं. तिथेही त्यांनी तिला बेदम मारहाण केली. यामुळे माझ्या आईच्या पायांना गंभीर दुखापत झाली.”
“शेजारच्या तरुणाने आम्हाला यापूर्वीही अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत ७ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून ते आम्हाला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच मी घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, ज्यामध्ये संपूर्ण घटना कैद झाली होती.” पोलिसांना दिलेल्या तक्रारीत कृष्ण कुमार यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची विनंती केली आहे.