सोलापूर : स्वत:ला संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत वावरणारा भोंदूबाबा मनोहरमामा भोसले याच्या उंदरगाव (ता. करमाळा) येथील आश्रमात एका भक्त महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबुवासह दोघांवर अत्याचार, खंडणी तसेच जादूटोणा विरोधी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला . ‘लोकमत’मधून ‘बुवाबाजीचा पर्दाफाश’ होताच उंदरगाव आश्रमातील ‘मनोहर मामा’ राज्यभर गाजला. त्याच्याविरुद्ध असंख्य तक्रारी येऊनही कोणत्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नव्हता. मात्र, मंगळवारी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे साताऱ्याच्या एका महिलेने धाव घेतली. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल झालेल्या फिर्यादीनुसार ही महिला या मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले या महाराजाची भक्त होती. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये खास साताऱ्याहून त्याचे दर्शन घेण्यासाठी आश्रमात आली. तिच्या कौटुंबिक समस्या तिने या बुवाला सांगितल्या. तेव्हा त्याने एका चिठ्ठीवर चार पुरुषांची नावे लिहून या लोकांसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत, असे स्पष्टपणे तिला सांगितले. तेव्हा तिने असा कोणताच प्रकार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र ‘मी खुद्द बाळुमामा बोलतोय. मला सगळं कळते’, असं या भोंदूबुवाने सुनावले. त्यानंतर तिचे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी पाच अमावास्या मठात येऊन पूजा-दर्शन घेण्याचे आदेश दिले. दर अमावास्येला काळ्या कापडाची पूजा करण्यासाठी पंधरा हजारांचा दरही ठरला. पाच अमावास्येचे ७५ हजारही तिने वेळोवेळी दिले. त्यानंतर १ लाख ११ हजारांची देणगीही तिच्याकडून घेतली.
एवढे होऊनही तिची संकटे काही संपेनात, तेव्हा तिने पुन्हा मामाशी संपर्क साधला. तेव्हा तिला बारामतीच्या आश्रमात बोलावण्यात आले. मार्च २०२० मध्ये ती या आश्रमात गेली असता रात्री उशिरापर्यंत थांबून ठेवण्यात आले होते.
मनोहर मामा भोसलेंसह बारामतीत तिघांवर गुन्हाबारामती (जि. पुणे) : कर्करुग्णास बरा करतो, असे सांगून बारामतीतील एकाची दोन लाख ५१ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्यासह तिघांवर जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शशिकांत खरात (रा. साठेनगर, बारामती) यांनी या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारदार खरात यांच्या वडिलांना ‘थायरॉइड कॅन्सर’ हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहर मामा भोसले या भोंदूबाबाच्या मौजे सावंतवाडी, गोजुबावी (ता. बारामती) मठामध्ये गेले. त्यांनी बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला. तक्रारदार यांच्या वडिलांचा कर्करोग बरा करतो, असे सांगून त्यावरील औषध दिले.