लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शिवसेना आणि भाजपमधील तणाव, राज्य ढवळून काढणारे चार दिवसापूर्वीचे धुमशान, कडकडीत बंदोबस्त अशा वातावरणात रत्नागिरीत जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली आणि एका चोरट्याने हीच संधी साधून चांगलाच हात मारला. दोघांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि एकाचे पैशाचे पाकीट या चोराने उडवले. एका बाजूला मंत्री नारायण राणे यांच्या झणझणीत भाषणाची चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला या चोरट्याने दिलेल्या आशीर्वादाचीही चर्चा रंगली होती.
मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे आणि त्यादरम्यान शिवसेनेने केलेल्या आंदोलनामुळे दोन्ही पक्षातील तणाव वाढला आहे. रोज दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत असल्याने रत्नागिरीतील जनआशीर्वाद यात्रेबाबत खूपच तणावाचे वातावरण होते. राजकीय अस्थिरता लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला होता.
कडक बंदोबस्त असतानाही झालेल्या गर्दीचा फायदा घेत एका चोरट्याने सोन्याची चेन आणि पाकिट पळवले. भाजपचे तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, रामदास शेलटकर आणि सुशील भाटकर या तिघांना त्याचा फटका बसला आहे. या प्रकाराची चर्चा यात्राभर सुरू होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्याची तक्रार दाखल झाली नव्हती.