लॉस अँजेलिस : मुंबईवरील 2008मध्ये झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला अमेरिकेमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला भारतात पाठविण्याची मोठी शक्यता आहे. राणा हा पाकिस्तानी-कॅनडाचा नागरिक असून त्याला अमेरिकेने 26/11 हल्ल्यामध्ये सहभागी असल्याने शिक्षाही केली होती.
तहव्वूर राणाला अमेरिकेच्या लॉस अँजेलिस शहरातून अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच राणाला तुरुंगातून सोडण्यात आले होते. मात्र, अमेरिकेच्या प्रशासनाने त्याला पुन्हा अटक केली आहे. सांगितले जात आहे की, ट्रम्प प्रशासन भारताला मोठे सहकार्य करत असून राणाच्या प्रत्यार्पणाची आवश्यक कागदोपत्री तयारी केली जात आहे. राणाची शिक्षा 2021 मध्ये संपणार होती. मात्र, त्याला त्या आधीच सोडून देण्यात आले होते.
तहव्वूर राणाला मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली 2009 मध्ये अटक करण्यात आली होती. लष्कर ए तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील विविध ठिकाणांवर हल्ले केले होते. यामध्ये अमेरिकी नागरिकांसह 166 जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी नऊ दहशतवाद्यांना ठार केले होते. तर अजमल कसाब या पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडले होते. पोलीस तुकाराम ओंबळे यांनी त्याला घट्ट पकडून ठेवले होते. यात त्यांना वीरमरण आले होते. मात्र, पाकिस्तानविरोधात सबळ पुरावा भारताच्या हाती लागला होता. यानंतर कसाबवर खटला चालविण्यात आला. याचे पुरावे पाकिस्तानलाही देण्यात आले. मात्र, पाकिस्तानने नेहमी प्रमाणे तो आपला नागरिक नसल्याचे सांगितले.
या हल्ल्य़ाप्रकरणी अमेरिकेमध्ये तहव्वूर राणला अटक झाली होती. त्याच्यावरही खटला सुरु होता. अखेर अमेरिकी न्यायालयाने त्याला 2013 मध्ये 14 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या हल्ल्याचा मोठा मास्टरमाईंड पाकिस्तानचे संरक्षण असलेला हाफिज सईद उघड माथ्याने पाकिस्तानात फिरत आहे. राणा भारताच्या हाती आल्यास पुन्हा पाकिस्तानविरोधात भारताला आक्रमक होता येणार आहे.
राणाच्या प्रत्यार्पणाची कागदपत्रे तयार करणे काहीसे कठीण काम आहे. या प्रकरणामध्ये पाच प्रशासकीय संस्था येतात. भारताचे परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, कायदे मंत्रालय आणि अमेरिकेचे परराष्ट्र आणि कायदे मंत्रालय या सर्वांची वेगवेगळी प्रत्यार्पण प्रक्रिया आहे. यामुळे या पाचही विभागांना ताळमेळ ठेवून काम करावे लागणार आहे.