मोखाडा - ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेमध्ये फेब्रुवारी २०१६ मध्ये उघडकीस आलेल्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्यातील मुख्य आरोपीच्या तब्बल चार वर्षांनंतर मुसक्या आवळल्या आहेत. सोमवारी पहाटे ५.०० वाजता हा सूत्रधार व त्याची पत्नी मोखाडा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. मुख्य आरोपीसह त्यांच्या पत्नीला अटक केली असून त्यांना ४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांकडून या प्रकरणाचा कूर्मगतीने तपास सुरू होता. मोखाडा शहरामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून उदयास आलेला हेमंत उदावंत हा अवघ्या काही वर्षांतच करोडपती झाल्याने तालुकाभर चर्चेचा विषय ठरला होता. मात्र अवघ्या काही दिवसातच त्याच्या अमाप मायेचे बिंग फुटले. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मोखाडा शाखेतील २.७३ कोटीच्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्याचा तो सूत्रधार असल्याचे उघड झाले. त्याने आपली पत्नी, शाखा व्यवस्थापक मोरे, शाखा हिशेबनीस गावित व बँकेचा व्हॅल्युअर चंद्रकांत बागुल, बँकेचा वॉचमन तसेच आपला वाहनचालक वसिम मणियार व अन्य कामगार अशा एकूण १७ लोकांच्या नावे मोखाडा शाखेत ५ किलो ३३७ ग्रॅम म्हणजे जवळपास २ कोटी ७३ लाखाचे बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतले. परंतु त्याची परतफेड वेळेत न झाल्याने तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या १७ कर्जधारकांवर मोखाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले, परंतु मुख्य सूत्रधार हा गेल्या चार वर्षांपासून फरार होता. त्याचे मोखाड्यात राजरोस येणे सुरू होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच त्याच्या मुसक्या आवळल्या असून या प्रकरणात आतापर्यंत २१ आरोपींना अटक झालेली आहे. एक आरोपी फरार असूून त्याचा तपास सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक गवई यांनी सांगितले.
बनावट सोने तारण आरोपीने आपली पत्नी, शाखा व्यवस्थापक मोरे, शाखा हिशेबनीस गावित, बँकेचा व्हॅल्युअर चंद्रकांत बागुल, बँकेचा वॉचमन, आपला वाहनचालक व अन्य कामगार अशा एकूण १७ लोकांच्या नावे बनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतले होते.