जळगाव : बीएचआर पतसंस्थेतील अपहार व फसवणूक प्रकरणात मास्टरमाईंड सुनील देवकीनंद झंवर (वय ५९,रा.जय नगर) याला सोमवारी पुणे विशेष न्यायालयाने ६ सप्टेबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची कारागृहात रवानगी केली.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने झंवर याला १० ऑगस्ट रोजी नाशिक येथून अटक केली होती. पहिल्या टप्प्यात १० दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३ दिवस कोठडी मिळाली होती. ही मुदत संपल्यानंतर सोमवारी त्याला न्या.गोसावी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. १३ दिवसाच्या पोलीस कोठडीत झंवर याने आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचे मान्य केले आहे. त्याशिवाय पुण्यातील २२ कोटी रुपयांच्या तीन मालमत्ता अवघ्या पावणे सहा कोटी रुपयात खरेदी केल्याचेही उघड झाले.