मुंबई - एका तरुणीला व्हिडीओ कॉल करून लैंगिक चाळे करणाऱ्या तरुणाला महिनाभरापासून मुंबई पोलीस अजूनही पकडू शकले नाहीत. मोबाईल क्रमांकावरून तो अज्ञात तरुण उत्तर प्रदेशात असल्याचे समजले; मात्र पोलिसांना अद्याप त्याच्यावर कारवाई करता आलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या या तरुणीने समाज माध्यमांवरून गाऱ्हाणे मांडले आहे.
या तरुणीच्याच एका मैत्रिणीला याच मोबाईल क्रमांकावरून व्हिडीओ कॉल आला, पण तक्रारदार तरुणीला होणारा त्रास कमी झाला नाही. काही दिवसांपूर्वी पुन्हा त्याच मोबाईल क्रमाकांवरून तिला कॉल आला. परंतु, पोलीस कारवाई होत नसल्याने मंगळवारी या तरुणीने समाज माध्यमांवर गाऱ्हाणे मांडले. त्यामुळे बुधवारी सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधून कारवाईचे आश्वासन दिले.
वर्सोवा येथे राहणाऱ्या या तरुणीला जुलैमध्ये पहिल्यांदा व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल आला. त्या व्यक्तीने अश्लील संभाषण केल्याची तक्रार तिने तत्काळ मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवली. त्यानंतर ३ ऑगस्टला पुन्हा त्याच मोबाईल क्रमाकांवरून या तरुणीला व्हिडीओ कॉल आला. तिने धाडस करून कॉल घेतला, तेव्हा समोरील तरुण हस्तमैथुन करत होता. तिने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनीवरून ही माहिती दिली असता, काही वेळातच स्थानिक पोलीस तक्रार घेण्यासाठी येतील, असे सांगण्यात आले. दोन-अडीच तास उटल्यानंतरही पोलिस न आल्यामुळे ४ ऑगस्टला पहाटे या तरुणीने वर्सोवा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.