Crime News : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मथुरामधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे ज्या महिलेच्या हत्येसाठी तिचा पती आणि मित्र तुरूंगात होते, ती तिच्या प्रियकरासोबत जिवंत सापडली आहे. पतीने मित्रासोबत मिळून दिवस-रात्र पत्नीबाबत माहिती गोळा केली आणि तिला प्रियकरासोबत राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील गावात पकडलं.
असं सांगण्यात आलं की, सूरज प्रसादची 25 वर्षीय मुलगी आरती पाच सप्टेंबर 2015 ला बेपत्ता झाली होती. याप्रकरणी आरतीच्या वडिलांनी जावई सोनू आणि त्याचे दोन मित्र भगवान सिंह व अरविंदवर मुलीची हत्या करून तिचा मृतदेह लपवल्याचा आरोप लावला होता. पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानंतर सोनू आणि त्याचा मित्र गोपाल यांना अटक करून तुरूंगात टाकलं होतं.
9 महिने तुरूंगात राहिल्यानंतर जामीनावर बाहेर आलेला पती सोनू आणि त्याचा मित्र गोपाल यांनी आरतीचा शोध घेणं सुरू केलं. शोधादरम्यान दोघांना आरती राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील मेहंदीपूर बालाजीच्या विशाला गावात असल्याची माहिती मिळाली. दोघांनी याची माहिती पोलिसांना दिली. नंतर पोलिसांनी आरती आणि तिच्या प्रियकराला या गावातून ताब्यात घेतलं.
पोलिसांनी सांगितलं की, पतीने त्याची पत्नी आरती जिवंत असल्याची सूचना दिली होती. सूचना मिळाल्यावर पोलिसांनी चौकशी केली तर हे सत्य निघालं. यानंतर पोलिसांची एक टीम विशाला गावात पाठवून आरती तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान समजलं की, आरतीने तिच्या प्रियकरासोबत लग्न केलं होतं.
पोलिसांनी पुढे सांगितलं की, आता आरतीची चौकशी केली जात आहे. तिचा जबाब घेतला जात आहे. लवकरच तिला कोर्टात हजर केलं जाईल. पोलीस म्हणाले की, यासंबंधी आरतीचे वडील सूरज यांचीही चौकशी केली जाईल. हेही विचारलं जाईल की, जो मृतदेह आरतीचा म्हणून दाखवला होता तो कुणाचा होता.