मथुरा येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे घोटाळेबाजांनी एका व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर जवळपास 20 वर्षे सरकारी कागदपत्रांमध्ये जिवंत ठेवलं आणि नंतर त्याची जमीन त्यांच्या नावावर करून घेतली. खरंतर 48 वर्षांपूर्वी जमीन मालकाच्या मुलीच्या नावावर होती.
अलिगडच्या लोढा भागात असलेल्या बधोन गावातील विद्या देवी या वृद्ध महिलेने आरोप केला आहे की मथुरा येथील सुरीर गावातील रहिवासी दिनेश सिंह, सुरेश सिंह, ओम प्रकाश यांनी त्यांची मौल्यवान जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केली आहे. मुलगा नसल्यामुळे वडिलांनी 1975 साली मुलगी विद्या देवीच्या नावे ही जमीन केली होती.
विद्या देवी यांचे वडील निद्दा सिंह यांचे 1976 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर 20 वर्षांनंतर म्हणजे 1995 मध्ये घोटाळेबाजांनी सरकारी कागदपत्रांमध्ये निद्दा सिंह यांना जिवंत केले आणि नंतर एकुलती एक मुलगी म्हणजेच विद्या देवी यांना मृत दाखवून मौल्यवान जमीन त्यांच्या नावावर करून घेतली.
निड्डा सिंह यांना जिवंत दाखवून अनेक एकर जमीन हडप केल्याचं पीडित कुटुंबाला अनेक वर्षांनंतर समजलं. कुटुंबीयांनी अतिरिक्त आयुक्त न्यायालयाचा आसरा घेतला. आता न्यायालयानेही पीडित पक्षाच्या बाजूने निर्णय दिला आहे. परंतु, मथुरा पोलीस राजकीय गोष्टींमुळे आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवत नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे.
याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलीस आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवत नसल्याचेही पीडित पक्षाचे म्हणणे आहे. तर कॅबिनेट मंत्री जयवीर सिंह यांनीही मथुरेच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना आरोपींवर कारवाई करण्यासाठी पत्र लिहिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.