लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ऑनलाइन लॉटरी सेंटरमधून चिठ्ठ्या लावून मटका जुगार अड्डा चालविणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून दहा हजारांच्या रोकडसह १८ हजार २८० रुपयांची सामग्री जप्त केली आहे.नौपाड्यातील पाटीलवाडी भागात सिद्धिविनायक ऑनलाइन लॉटरी सेंटर येथे दोघे जण मोबाइलद्वारे विनापरवाना लॉटरीचा जुगार खेळत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, योगेश काकड आणि उपनिरीक्षक दीपेश किणी आदींच्या पथकाने २ ऑक्टोबर रोजी या लॉटरी सेंटरवर धाड टाकली. त्याठिकाणी दोघे जण विनापरवाना गोल्डविन लॉटरीचा जुगार खेळत असल्याचे आढळले. त्यांच्याकडून रोकड आणि जुगाराची सामग्री असा १८ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अन्य एका कारवाईमध्ये ठाणे एसटी डेपोच्या मागे सिडको बसस्टँडकडे जाणाऱ्या पदपथावर मटका जुगार अड्डा चालविणाऱ्या तिघांना या पथकाने अटक केली. त्यांच्याकडूनही रोख रक्कम आणि जुगाराची सामग्री असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंध कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.