बल्लाळनाथ शिंदे
चिंचोली ब. (जि. लातूर) : गावात सुरू असलेली अवैध दारू, मटका बंद करावा, या मागणीसाठी लातूर तालुक्यातील चिंचोली-बल्लाळनाथ येथील नवनाथ हरिभाऊ जलदे (वय ४६) हे सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्यासुमारास टॉवरवर चढले आहेत. तब्बल तेरा तास उलटले. मध्यरात्रीचे १.३० वाजले तरी ते खाली आले नाहीत. अनेकांनी विनवणी केली. तहसीलदार स्वप्नील पवार, गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांनी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने ते दोघेही निघून गेले.
पोलीस व महसूल विभागाकडून त्याची समजूत काढण्यात येऊनही तो खाली येत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. सायंकाळी लातूरहून अग्निशामन दलाचे पथकही घटनास्थळी पोहंचले होते. चिंचोली-बल्लाळनाथ येथे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दारू, गुटखा, मटका बंद करण्यात यावा, यासाठी तरुणाने अचानक टॉवरवर चढून आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे. दुपारपासून अनेकजण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करीत असून, रात्री १ वाजेपर्यंत तरुण खाली उतरला नव्हता. घटनास्थळी नायब तहसीलदार राजेश जाधव, श्रावण उगले, सपोनि. ए. बी. घारगे, बीट अंमलदार एस. एन. जाधव, तलाठी जी. आर. मुळे हे उशिरापर्यंत बसून हाेते. यावेळी उपसरपंच विश्वास कावळे, अनिल पाटील, मधुकर जोगदंड, पोलीस पाटील अजित माळी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजकुमार सुरवसे यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ग्रामविकास अधिकारी व्ही.एस. हणमंते हे रात्री उशिरापर्यंत बसून होते. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सर्वजण निघून गेले तरीही नवनाथ खाली उतरले नाहीत. दरम्यान, जोपर्यंत टॉवरला संरक्षण भिंत बांधण्यात येणार नाही, तोपर्यंत हे टॉवर चालू करू नये, अशा सूचना महसूल प्रशासनाने दिल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आंदोलन म्हणावे की स्टंट काहीच कळेनाअचानक टॉवरवर चढून आंदोलन सुरू केलेल्या तरुणास खाली उतरविण्यासाठी पोलिसांसह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. तसेच जलदे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनीही त्यांना खाली येण्यासाठी विनंती केली; मात्र कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी गावातील नागरिकांसह बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अचानक केलेला हा प्रकार आंदोलन की स्टंट हे कोणाच्याच लक्षात येईना.
तहसीलदार, बीडीओंनी भेट देऊन केली विनवणीटॉवरची उंची जवळपास २५० फुट इतकी आहे. याठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने कोणीही येते. सोमवारी दुपारी १२.३० वाजेपासून टॉवरवर चढून बसलेल्या तरूणाची मागणी नेमकी काय, हे प्रशासनालाही कळेना. अवैध दारू विक्री, मटका आदी मागण्या असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांनी एकदाही कुणाकडे तक्रार केली नाही. अचानक करण्यात आलेला हा प्रकार आंदोलन समजावा की अन्य काही असा प्रश्न सर्वांनाच पडला. रात्री १० वाजण्याच्या सुमारास तहसीलदार स्वप्नील पवार, गटविकास अधिकारी शाम गोडभरले यांनी भेट देऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र नवनाथ जलदे यांनी त्यांचेही ऐकले नाही. रात्री १ वाजेपर्यंतही ते टॉवरवरच बसून होते.