लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौरसंदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे राजकीय वर्तुळासोबतच पोलीस प्रशासनातही प्रचंड खळबळ उडाली आहे. या गोळीबाराचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून, पोलीस आयुक्त, सहआयुक्त स्वत: तपासाच्या प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवून आहेत. दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांनी या गोळीबाराचा तीव्र निषेध नोंदवून बेलतरोडी पोलीस ठाण्याला बुधवारी घेराव घातला. २४ तासांच्या आत आरोपींना अटक करा, अशी त्यांची मागणी आहे.महापौर जोशी कौटुंबिक मित्र-परिवारातील सदस्यांसह मंगळवारी रात्री नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जवळ असलेल्या रसरंजन ढाब्यावरून जेवण करून परत येत होते. त्यांच्या वाहनामागून दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी जोशी यांच्या वाहनावर(एमएच ३१/एफए २७००) चार गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यातील एकही गोळी जोशी किंवा त्यांच्या सोबत बसून असलेले त्यांचे मित्र आदित्य ठाकूर यांना लागली नाही. या गोळीबाराच्या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक एक्स्पर्टकडून रात्रीच वाहनावरील गोळीबाराचे नमुने तसेच रिकाम्या बुलेट जप्त केल्या. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. हल्लेखोरांना शोधण्यासाठी पाच वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून, शहरातील प्रत्येकच पोलीस या प्रकरणातील आरोपींची माहिती काढण्यासाठी कामी लागला आहे. तपासाशी संबंधित प्रत्येक घडामोडीची माहिती पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय आणि सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम घेत आहेत. खापरी ते रसरंजन तसेच बाजूच्या एम्प्रेस पॅलेससह ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मार्गावर तसेच आजूबाजूची हॉटेल्स, ढाब्यांवर मंगळवारी रात्री कोण आले, कोण गेले, त्याचीही माहिती काढली जात आहे. दरम्यान, हा गोळीबार कोणत्या हेतूने कुणी केला, त्याचा तपास केला जात आहे. जोशी यांनी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे दुखावलेल्यांपैकी कुणाचा यात हात आहे का, त्याचीही पडताळणी केली जात आहे. या संबंधाने पोलिसांनी सकाळपासून १०० पेक्षा जास्त जणांना विचारपूस केली. वृत्त लिहिस्तोवर अनेकांची चौकशी केली जात होती.जोशींना सुरक्षा !राज्य सरकारने या हल्लयाची गंभीर दखल घेतली असून गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर जोशी यांना बोलवून त्यांची विचारपूस केली. तुम्ही काळजी करू नका, हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, जोशी यांना संरक्षण देण्यात आले असून, त्यांना सशस्त्र सुरक्षा रक्षक सोबत देण्यात आला आहे. त्यांच्या निवासस्थानीही सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे.
महापौरांवरील गोळीबार : सीसीटीव्ही ताब्यात, रिकाम्या बुलेट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 9:07 PM
महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे राजकीय वर्तुळासोबतच पोलीस प्रशासनातही प्रचंड खळबळ उडाली आहे. या गोळीबाराचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला
ठळक मुद्देतपासचक्र वेगात, पाच पथकांची धावपळ