पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे बँक अकाऊंट बनावट ईमेलद्वारे 'हॅक' करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार आहे. महापौरांच्या जागरूकतेमुळे 'नायजेरियन फ्रॉड'ची ही बाब उजेडात आली. पोलिसांनी तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महापौरांनी केली.
महापौर मोहोळ यांच्या महापालिकेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर एक ईमेल आला असून 'आपणास परदेशातील कंत्राटदार म्हणून देय असलेली रक्कम मिळाली की नाही याची खातरजमा करण्यासाठी हा ई मेल पाठवीत आहोत. ही रक्कम मिळाली नसल्यास या मेलला उत्तर द्या. 'फंड टू एटीएम' या रोख हस्तांतरणासाठी आपले पूर्ण नाव, संपर्क क्रमांक, पासपोर्ट किंवा ड्रायव्हरचा परवाना, मोबाईवल क्रमांक पाठवावा असे या ई मेल मध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच या ईमेलमध्ये फेडरल सरकार आणि सेंट्रल बँकेच्या नावाचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.
महापौरांच्या नावाचा पालिकेचा अधिकृत ईमेल आयडी आहे. या ईमेल आयडीवर नायजेरियन फ्रॉड द्वारे २ नोव्हेंबर रोजी ई-मेल पाठविण्यात आला. मेहमूद बुरानी नावाच्या व्यक्तीच्या नावे हा मेल आला असून 'एफजीएन एटीएम'चा प्रवक्ता असल्याचे या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. सुदैवाने हा प्रकार नायजेरियन फ्रॉडचा असल्याचे महापौरांच्या लक्षात आले. त्यांनी महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना या ई-मेलला कोणताही प्रतिसाद न देण्याच्या सूचना दिल्या. महापौरांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला. जिथे महापौरांचे खाते हॅक करण्याचा प्रयत्न होतो आहे तिथे सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. --------कंत्राटदार म्हणून देय रक्कम पाठविणे आणि एटीएमसंदर्भात माझ्या पालिकेच्या अधिकृत ई-मेल आयडीवर एक ईमेल आला. हा प्रकार नायजेरियन फ्रॉडचा असून खाते हॅक करण्याचा प्रयत्न असल्याचे लक्षात आल्याने त्याला प्रतिसाद दिला नाही. यासंदर्भात सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून तपासाची मागणी केली आहे. नागरिकांनीही ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घ्यावी.- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे