मुंबई - गोरेगाव येथील आंबेडकर नगर परिसरातील गटाराच्या नाल्यात दिव्यांश पडला. या घटनेला ३६ तास उलटले आहेत. तरीही माझा मुलगा सापडलेला नाही. शोधपथक वरवरची शोधमोहीम राबवत आहे. पालिका प्रशासनासोबत पोलीस देखील जबाबदार आहेत. कारण आम्हाला मदत करणाऱ्यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात डांबत आहेत. आम्ही प्रेमनगर येथील नाल्याजवळ शोधकार्य सुरु असताना गेलो असता येथून परताना माझ्यासोबत असलेल्या श्रवण तिवारी या सामाजिक कार्यकर्त्याची कॉलर पकडून पोलिसांनी नेले. याचा अर्थ आम्हाला मदत करणाऱ्या लोकांना पोलीस पकडून नेऊन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिव्यांशचे वडील सूरज सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दिव्यांश मिळाला नाही, तर मुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सूरज सिंग यांनी केली आहे.
दिव्यांश न सापडल्याने आज गोरेगाव पूर्वमधील आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही खबरदारी घेत दिंडोशी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सामाजिक कार्यकर्ता श्रवण तिवारी यांना पोलिसांनी आंदोलनापूर्वीच ताब्यात घेतले आहे. दिव्यांश ज्या ठिकाणी नाल्यात पडला होता. त्याच्या आसपासच गटारे, नाले आणि ड्रेनेज लाईनमध्ये आता शोध मोहीम राबवण्यात येत आहे.