मंगेश कराळे
नालासोपारा : मुंबई पोलिसांनी नालासोपारा शहरातून चौदाशे करोडचा अंमली पदार्थांचा साठा बुधवारी रात्री पकडला होता. हे प्रकरण ताजे असतानाच गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी प्रगती नगरमध्ये लाखो रुपयांचा एम डी अंमली पदार्थ पकडल्याने खळबळ माजली आहे. तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन आरोपींपैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दोन फरार आरोपींचा शोध घेत पोलीस पुढील तपास करत आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांना तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रगती नगर येथे एम डी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी संध्याकाळी पावणे सहा वाजता प्रगती नगर हाय टेन्शन रोडवरील रिक्षा स्टँड जवळ एका संशयित भाजी विक्रेता आरोपी बिरजू ठाकूर (४०) ताब्यात घेऊन झडती घेतल्यावर १८ लाख ५६ हजार २५० रुपये किंमतीचा २६१ ग्रॅम एमडी विक्री करिता बाळगलेला मिळून आला आहे. गुन्हे शाखा एकचे अविनाश गर्जे यांनी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बिरजू ठाकूर (४०) याला अटक केली असून आरोपी सोहेल कामाठीपुरा आणि मोयना खातून उर्फ ठाकूर हे दोघे फरार आहेत.