नागपूर : अमली पदार्थाचा तस्कर जावेद उर्फ बच्चा खान याची कारागृहात प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. यासंबंधाने उलटसुलट चर्चा सुरू झाल्यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.
मध्यभारतातील कुख्यात एमडी तस्कर आबू खान याचा जावेद राईट हॅन्ड मानला जायचा. त्याच्याविरुद्ध प्राणघातक हल्लासह अनेक गुन्हे दाखल आहेत. जानेवारी २०१८ मध्ये गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. त्यानंतर आबू खानला पोलिसांनी अटक करून कारागृहात डांबले. गेल्या महिन्यातच आबूची जामिनावर कारागृहातून मुक्तता झाली. गेल्या चार-पाच दिवसांपासून जावेदची प्रकृती बिघडल्यामुळे त्याच्यावर कारागृहातील इस्पितळात उपचार सुरु होते. बुधवारी रात्री जावेदची तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री ९.३० च्या दरम्यान जावेदला डॉक्टरांनी मृत घोषित केले. विशेष म्हणजे, मंगळवारी कारागृहातील कैदी दिनेश चरपे बयाचाही मृत्यू झाला होता. २४ तासात दोघांचा मृत्यू झाल्यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. जावेदच्या अनुषंगाने उलट-सुलट चर्चा सुरु आहे. कारागृहात चार दिवसापूर्वी मारहाणीची घटना घडली होती. यात जावेदला जोरदार मार लागल्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला, अशी चर्चा आहे. मात्र कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी त्याचा इन्कार केला. जावेदला अंडकोशाचा त्रास होता. त्याच्यावर अनेकदा उपचारही करण्यात आले होते. तो याच त्रासामुळे चार पाच दिवसापासून कारागृहातील इस्पितळात होता. आराम न झाल्यामुळे बुधवारी रात्री मेडिकलमध्ये त्याला उपचारासाठी पाठवल्याचे त्यांनी सांगितले. कारागृह प्रशासनाला काही जण जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातूनच ही चर्चा सुरू झाली असावी, असे मत कुमरे यांनी व्यक्त केले. दरम्यान, धंतोली पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.प्रशासन धास्तावलेकोरोनाच्या संक्रमणामुळे आधीच कारागृह प्रशासन धास्तावले आहे. अलीकडे कैद्याच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांनी ही धास्ती जास्तच वाढली आहे.