कवठेमहांकाळ : इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथे एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करण्यात आला. एका शेतात सुरू असलेल्या कारखान्यावर मुंबई पाेलिसांच्या पथकाने छापा टाकला. मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंदाजे १०० किलो एमडी ड्रग्ज सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २४६ कोटी असल्याचे सांगण्यात आले.
कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती नीरज उबाळे यांना मिळाली. त्यांच्यासह मुंबई गुन्हे अन्वेषण पथकाने रविवारी रात्रीपासून इरळी येथे ठाण मांडले आहे. इरळीतील एका शेतात एमडी ड्रग्ज निर्मितीचा गोरखधंदा सुरू होता. मुंबई पाेलिसांनी हा कारखाना उद्ध्वस्त करीत सुमारे शंभर किलाे एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. दरम्यान, या कारखान्याचा मालक कवठेमहांकाळ तालुक्यातील असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक उबाळे यांनी सांगितले.मुंबई गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे, निरीक्षक आत्माजी सावंत यांच्यासह आठ ते दहा अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक या कारवाईत सहभागी हाेते.
मिरजेत तीन किलो गांजा जप्त मिरज (जि. सांगली) पोलिसांनी गांजा विक्रेत्यास पकडून तीन किलो गांजा, दुचाकी असा सव्वा लाखाचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी आशुतोष निशिकांत देवकुळे (वय ३५, रा. तासगाव) यास अटक केली आहे. आशुतोष देवकुळे हा त्याच्या पिशवीत ३ किलो १०० ग्रॅम गांजा घेऊन आंबेडकर उद्यानाजवळ आला होता. देवकुळेकडून ७७ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.