यवतमाळ : पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यूप्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच सदस्यीय पथक यवतमाळात दाखल झाले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डाॅ.मिलिंद कांबळे यांचा जबाब नोंदविला. यवतमाळ शहर ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांशीही चर्चा देखील केली. पूजावर ट्रिटमेंट झाल्याच्या संशयावरून अधिष्ठातांचा जबाब नोंदवला.
पुणे येथील वनवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूजा चव्हाण (२२) रा.परळी जि.बीड या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणाचे तार थेट यवतमाळशी जुळलेले असल्याचे चर्चिले गेले. पूजावर यवतमाळात उपचार केले गेल्याचाही संशय पोलिसांना आहे. याच अनुषंगाने तपास करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक जयंत जाधव यांच्या नेतृत्वातील पोलीस पथक सोमवारी यवतमाळात येऊन गेले. या पथकाने दिवसभर शासकीय रुग्णालय परिसराची बारकाईने पाहणी केली. यंत्रणेकडून काही धागा मिळतो का, या दृष्टीने चाचपणी केली. अधिष्ठाता डाॅ.मिलिंद कांबळे यांना संबंधित घटनेच्या माहितीबाबत सूचनापत्र दिले. इतकेच नव्हेतर डाॅ. कांबळे यांचे बयाण नोंदविण्यात आले. पूजा हिचे नाव बदलवून तर उपचार करण्यात आला नाही ना, या दिशेनेही पोलीस तपास करीत आहे. पुणे पोलिसांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे १ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत पूजा चव्हाण नावाच्या मुलीने स्त्रीरोग विभागात ट्रिटमेंट घेतली काय, याची माहिती लिखित पत्राद्वारे मागितल्याचेही सांगितले जाते. या पथकाने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशीही या प्रकरणी चर्चा करून आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.
Exclusive : पूजा चव्हाण प्रकरण नेमकं कसं बाहेर आलं?; ॲाडिओ क्लिप्स कशा झाल्या व्हायरल?... वाचा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तिच्या वडिलांनी या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांना क्लीन चिट दिली आहे. मात्र तरीदेखील महाराष्ट्रातले राजकारण ढवळून निघाले आहे. यानंतरही भाजपा या प्रकरणात आक्रमक झाली असून या संपूर्ण प्रकरणामध्ये संजय राठोड यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपाचे नेते करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी चौकशीची गती थोडी वाढवली आहे.पोलीस दबावाखाली तपास करत आहेत. पुणे पोलिसांनी आतापर्यंत तीन जबाब नोंदवले आहेत. याआधी पूजाचा मित्र अरुण राठोड आणि पूजाचा चुलत भाऊ विलास चव्हाण यांचे जबाब नोंदवण्यात आले होते. गेल्या रविवारी ७ फेब्रुवारीला पूजाने आत्महत्या केली. त्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली.
संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल- गृहमंत्री
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आता पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलं आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्याची मागणी भाजपाकडून होत आहे. मात्र संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत.
कोण आहे पूजा चव्हाण?
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.