ठाणे : अभ्यासाच्या तणावातून राहूल समीर दळवी (१९) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल केल्याची माहिती सोमवारी पोलिसांनी दिली.
वागळे इस्टेट, रामचंद्रनगर, वैतीवाडी येथील एका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर वास्तव्याला होता. तो बंगळूर येथे वैद्यकीय विभागामध्ये फिजिओथेरपीच्या प्रथम वर्ष वर्गात होता. अलिकडेच १८ नोव्हेंबर रोजी तो ठाण्यात परतला होता. ठाण्यात तो आई वडिल आणि आजीसह वास्तव्य करीत होता. रविवारी सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घरात आई आणि आजी असतांना बेडरुमध्ये त्याने गळफास घेतल्याचे आढळले.
या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याचे वडिल समीर दळवी यांनी तातडीने ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तेथील डॉक्टरांनी तो मृत पावल्याचे घोषित केले. प्राथमिक तपासात तरी अभ्यासाच्या ताणातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले आणि निरीक्षक विजय मुतडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे हे अधिक तपास करीत आहेत.