लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमलीपदार्थांची विक्री व अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या ६६५ जणांवर पोलिसांनी गेल्या ९ महिन्यात अटकेची कारवाई केली आहे. गेल्या वर्षी पेक्षा कारवाईत मोठी वाढ झाली आहे.
अंमली पदार्थांची तस्करी , विक्री व सेवन रोखण्यासाठी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी हद्दीतील १६ पोलीस ठाण्यांच्या प्रभारींसह गुन्हे शाखा , अमली पदार्थ विरोधी शाखांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत . या शिवाय नागरिकांनी देखील अश्या प्रकारांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे . पोलीस आयुक्तालयाच्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली . पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रामुख्याने अन्न व औषध प्रशासन, सीमाशुल्क विभाग, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य विभाग सहभागी झाले होते.
२०२१ मध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्या १०५ तस्कर विक्रत्यांवर तर सेवन करणाऱ्या ४०८ जणांवर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली होती . तर १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंतच्या ९ महिन्यांच्या काळात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या ११७ व त्याचे सेवन करणाऱ्या ५४८ जणांना पकडण्यात आले . २०२१ च्या तुलनेत २०२२ ह्या चालू वर्षात पोलिसांनी अमली पदार्था विरोधातील कारवाई तीव्र केली असल्याचे आकडेवारी सांगते . तर अमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई करण्यासह गस्त वाढवणे , त्यांच्या जागा हुडकून काढणे तसेच तस्करी करणाऱ्यांची पाळेमुळे खणून काढण्याची गरज व्यक्त होत आहे.