नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मेरठमध्ये (Meerut) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र नवरीने सर्वांनाच धक्का देत दागिने घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही तर तिचे नातेवाईक, पंडित सर्वच जण खोटे असल्याचं आता समोर आलं आहे. लग्नाच्या नावाने आपली खूप मोठी फसवणूक झाल्याचं लक्षात येताच नवरदेवाने थेट पोलिसांत धाव घेतली आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास करण्याची मागणी केली आहे. ऐन लग्न सोहळ्यात हा प्रकार घडल्याने सर्वच जण हैराण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगर येथील देवेंद्रचं लग्न हे मेरठच्या परतापूर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत ठरलं होतं. मुलीकडच्यांनी नवरदेवाकडे एक लाख रुपयाची मागणी केली होती. लग्नाच्या वेळी मुलाने पैसे आणि सोन्याचे दागिने हे नवरीला दिले. मात्र सात फेरे घेत असताना मध्ये चौथा फेरा झाल्यानंतर नवरीने बाथरूममध्ये जाण्याचं कारण सांगितलं आणि बराचं वेळ झाला तरी ती परत आलीच नाही. तसेच तिला शोधण्यासाठी गेलेल नातेवाईक देखील अचानक गायब झाले.
देवेंद्रने दिलेल्या माहितीनुसार, परतापूरच्या एका गावामधील शिव मंदिरात लग्नसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ठरल्याप्रमाणे सर्व विधी देखील सुरू झाले. मुलीकडून तीन जण उपस्थित होते. तर मुलाकडून चार जण आले होते. चार फेरे झाल्यानंतर मुलीकडच्यांनी पैसे आणि दागिने मागितले. नवरदेवाने ते पैसे दिल्यानंतर एक फेरा पूर्ण करण्यात आला. आणि त्याचवेळी नवरीने बाथरुमला जाण्याचं कारण सांगितलं आणि ती परत आलीच नाही. नवरीची मावशी असल्याचं सांगणारी आणखी महिला आणि आणखी एक व्यक्ती तिला शोधण्याच्या बहाण्यानं तिथून निघून गेले.
लग्न लावणारा पंडीतही याच दरम्यान गायब झाला. बराच वेळ कोणीच परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचं देवेंद्र आणि त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं. नवरदेवाने परतापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोबतच नवरीचा फोटोही दिला. पोलीस या प्रकरणात दिल्या गेलेल्या मोबाईल नंबरच्या आधारे पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.