Crime News: सोशल मीडियावर भेट, मग लव्ह मॅरेज, तीन महिन्यांनंतर पत्नीनं केलं असं कांड की पतीला बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 07:32 PM2022-08-20T19:32:28+5:302022-08-20T19:32:59+5:30
Crime News: मध्य प्रदेशमधील इंदूरच्या लसुडिया परिसरामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथील व्यापारी सिंघानिया यांनी त्यांच्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
इंदूर - मध्य प्रदेशमधील इंदूरच्या लसुडिया परिसरामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथील व्यापारी सिंघानिया यांनी त्यांच्या पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सिंघानिया यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या पत्नीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या दोघांनीही सुमारे तीन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केला होता. ऑनलाईन साईट्सवर या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अखेर या प्रेमाचे रूपांतर विवाहामध्ये झाले होते. विवाहानंतर नवदाम्पत्य परदेशात फिरायलाही गेले. परदेशात असतानाच दोघांममध्ये काही वाद झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हल्लीच त्यांची पत्नी रुची ही कुणालाही काही न सांगता घरातून गायब झाली. धक्कादायक बाब म्हणजे ती गायब झाल्यापासून घरातील लाखो रुपयांचे दागिनेही गायब झाल्याचे समोर आले. आता व्यापाऱ्यासह स्वत: पोलिसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.
शहरातील अत्यंत पॉश परिसरामध्ये गणना होणाऱ्या शांतीनिकेतनमध्ये राहणाऱ्या नितेश सिंघानिया यांची ओळख सोशल मीडियावरून उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या रुची हिच्याशी झाली होती. दोघेही आधीपासून विवाहित होते. मात्र जोडीदारांसोबत झालेल्या मतभेदांनंतर त्यांनी घटस्फोट घेतलेला होता. दरम्यान, या दोघांमध्ये झालेली ऑनलाईन मैत्री हळुहळू प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले. काही दिवसांनंतर युरोपला गेले असताना या दोघांमध्ये काही वाद झाला. मात्र हे भांडण तेवढ्यावरच संपल्याचे व्यापाऱ्याला वाटले होते.
पण इंदूरला आल्यानंतर काही दिवसांनी रुची गायब झाली. व्यापाऱ्याला जेव्हा याबाबतची कुणकूण लागली, तेव्हा त्याने सातत्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्याने फोन उचलणेसुद्धा बंद केले. व्यापाऱ्याने जेव्हा घरातील दागिन्यांचा शोध घेतला तेव्हा तेही गायब असल्याचे निष्पन्न झाले. या दागिन्यांची किंमत अंदाजे ५० लाख रुपये आहे. त्यानंतर नितेश याने लसुडिया पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आता या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंघानिया यांनी तक्रार दिली होती. त्याआधारावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रकरणाचा तपास सुरू आहे. तक्रारदाराने पत्नीबाबत संशय घेतला आहे. आता या प्रकरणी अधिक माहिती घेतला जात आहे.