- पंकज लायदे
धारणी : मेळघाटातील प्रकल्प कार्यालय अंतर्गत येणाऱ्या एका शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन आदिवासी विद्यार्थीनीचा वैद्यकीय तपासणी दरम्यान तेथील कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्याने विनयभंग केला. यासंदर्भात माहिती विद्यार्थीनीने शाळेतील मुख्याध्यापकासह शिक्षकांना दिल्यानंतरही त्यांनी विद्यार्थिनीलाच चुप्पी साधायला लावून गुन्हा लपविला. त्यासह त्या वैदयकीय अधिकाऱ्याला सहकार्य केले. याबाबत तिने धारणी पोलिसात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून त्या वैदयकीय अधिकाऱ्यांसह शाळेतील मुख्याध्यापक, महिला शिक्षिका व शिक्षकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. धारणी प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या एका शासकीय आश्रम शाळेत तालुक्यातील एका गावातील आदिवासी विद्यार्थीनी ही शिकत होती आणि आश्रम शाळेतीलच निवासी वसतिगृहात राहत होती. दिनांक 13 सप्टेंबर बुधवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान तिची तब्येत खराब झाली असता आश्रम शाळेतील शिक्षक जवरे व शिक्षका मंगला हे दोघे तिला प्राथमिक आरोग्य केंद्र साद्राबाडी येथे उपचारकरींता घेऊन गेले असता शिक्षिका मंगला या बाहेरच होत्या आणि शिक्षक जवरे हे बाजूच्या रूममध्ये होते. तेव्हा तेथील कार्यरत वैदयकीय अधिकारी अजय मालवीय आणि विद्यार्थीनी हे दोघे चेकअप रुममध्ये एकटेच होते. तेव्हा अजय मालवीय यांनी तिचा विनयभंग केला.
दरम्यान, यावेळी घडलेला प्रकार तिने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. यानंतर तिच्यासह कुटुंबीयांनी धारणी पोलिस स्टेशनला येऊन गुरुवारला रात्री उशिरा तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी अजय मालवीय, मुख्याध्यापक अतुल, शिक्षिका मंगला शिक्षक रावसाहेब या चौघांविरुद्ध कलम 354,354,अ 354 ब भादवी सहकलम 8,12,21 पोक्सो सहकलम 3(1)(w)(2),3(2)(va) अं.जा.व जमा.अत्याचार कायद्या अनवये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास मोर्शी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे
सदरची घटना मला माहिती पडली असून त्यातील दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे तर कार्यलयातील अधिकारी कर्मचारी यांची समिती गठीत करून शाळेतील विद्यार्थीनीची चौकशी करून त्या मुख्याध्यापकासह महिला शिक्षक व शिक्षकावर कारवाई करण्यात येईल. - रिचर्ड यांथन (आयएएस)प्रकल्प अधिकारी धारणी