प्रसिद्द उद्योजक सायरस मिस्त्रींचे अपघाती निधन झाले आणि उद्योगविश्वात मोठी खळबळ उडाली. या अपघाताचा धक्का एवढा मोठा होता की गडकरींनी आठवडाभरातच नवीन नियम लालू करण्याची घोषणा केली. एवढेच नाही तर ज्या कंपनीची ती कार होती, त्या मर्सिडीज बेंझ कंपनीत देखील मोठी खळबळ उडाली आहे. या कंपनीचे हेडक्वार्टर असलेल्या जर्मनीने या अपघाताच्या चौकशीत लक्ष घातले आहे.
मर्सिडीजने या अपघाताची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. कारमध्ये एक चिप लावलेली असते, ती कंपनीने आपल्या ताब्यात घेऊन जर्मनीला पाठविली आहे. जर्मनीच्या मुख्यालयात या चिपमधील डेटाचे विश्लेषण केले जाणार आहे. हा अपघात कसा झाला आणि सात एअरबॅग असूनही तीनच कशा उघडल्या याचाही तपास केला जाणार आहे. आम्ही ग्राहकांच्या गोपनीयतेचा आदर करणारा एक जबाबदार ब्रँड आहोत. आमची टीम शक्य असेल तेथे पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे. त्यांना आम्ही थेट उत्तर देऊ. सायरस मिस्त्री आणि जहांगीर पांडोले यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे, असे मर्सिडीजने म्हटले आहे.
मर्सिडीज-बेंझच्या टीमने सोमवारी मिस्त्री यांच्या अपघात ग्रस्त कारची पाहणी केली. या कारमध्ये काही चिप बसविलेल्या असतात, त्या ताब्यात घेऊन विश्लेषणासाठी जर्मनीला पाठविल्या जाणार आहेत. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले की, "वाहनाची सर्व माहिती नोंदवणारी ही चिप विश्लेषणासाठी जर्मनीला नेण्यात येणार आहे. आठवड्याच्या अखेरीस त्याचा अहवाल येण्याची आम्हाला अपेक्षा आहे."
अपघाताच्या कारणाचे विश्लेषण करण्यासाठी डेटा डिक्रिप्ट केला जाईल. टायर प्रेशर, ब्रेक फ्लुइड, वेग, काही बिघाड, स्टीयरिंग व्हील कंडिशन, सीटबेल्ट आणि कारची एअरबॅग कंडिशन यांसारख्या गोष्टी देखील कंपनी तपासणार आहे. जगातील बहुतांश श्रीमंतांकडे या कंपनीच्या कार आहेत. मिस्त्री ही काही साधी असामी नव्हती. टाटा सन्सची धुरा य़ा व्यक्तीच्या एकेकाळी हातात होती. टाटा सारख्या कंपनीमध्ये मिस्त्रींच्या परिवाराची अब्जावधींची गुंतवणूक आहे. यामुळे मर्सिडीजने आपल्या नावाला कलंक लागू नये म्हणून ही चौकशी सुरु केल्याचे जाणकारांमध्ये बोलले जात आहे.