मुंबई - अभिनेत्री तनुश्री दत्तासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, सामी सिद्धीकी आणि राकेश सारंग यांच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात १० ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या चौघांविरोधात पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, आता ओशिवरा पोलिसांनी कोर्टात बी समरी अहवाल सादर केला असून त्यात नाना पाटेकर यांच्याविरोधात पुरावे नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अभिनेत्री तनुश्री दत्ताने काही महिन्यांपूर्वी #MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मोठा गदारोळ झाला होता. या गाण्यातील एका दृश्यावर तनुश्रीने आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिने या चित्रपटातून माघार देखील घेतली होती. त्यानंतर ती परदेशात वास्तव्यास गेली होती. गेल्या वर्षी ती परदेशातून भारतात आली. त्यानंतर तिने #MeToo मोहिमेअंतर्गत नाना पाटेकरांविरोधात लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला होता. मात्र, ओशिवरा पोलिसांनी कोर्टात बी समरी सादर केली असून तनुश्री यांनी केलेले आरोप कमकुवत असल्याचं आढळून आलं असल्याने नाना पाटेकर यांना दिलासा मिळाला आहे.