मुंबई : #MeToo ही चळवळ आता सामाजिक क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रातही पसरत आहे. आता मुंबईतील सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीनेही असाच प्रकार आपल्यासोबत घडल्याचे फेसबुकद्वारे सांगितले आहे.कृपा फर्नांडिस हिने झेव्हिअर्स महाविद्यालयाच्या स्टुडंट कौन्सिलच्या फेसबुक पेजवर, तसेच आपल्या वैयक्तिक फेसबुक पेजवर आपल्याला आलेला अनुभव कथन केला आहे. महाविद्यालयातील महिला विकास कक्ष विद्यार्थिनी आणि महिलांची बाजू समजून घेत नसतील तर असे कक्ष नसलेले बरे, अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली आहे.कृपा ही सध्या नोकरी करते. जानेवारी २०१५ मध्ये तिने महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाकडे आपला प्रियकर आपल्याला मारहाण करीत, अपमानकारक वागणूक देत असल्याची तक्रार केली होती. आठवड्यानंतर तिच्या तक्रारीची दखल घेत तिला महिला विकास कक्षाच्या समितीसमोर उभे करण्यात आले. मात्र मानसशास्त्राच्या प्राचार्या, इतिहास विषयाचे प्राचार्य, समाजसेवी संस्थेच्या महिला यांचा समावेश असलेल्या समितीने कृपाची बाजू समजून घेण्याऐवजी तिलाच चुकीचे ठरविले. तुझ्यावर कोणत्या प्रकारचे उपचार सुरू आहेत का? तू याआधी किती रिलेशनशिप्समध्ये होतीस? असे प्रश्न तिला विचारण्यात आले. लैंगिक शोषण झाल्याची माहिती तिने सांगितल्यानंतर, ‘तुम्ही रिलेशनशिप- मध्ये होतात ना... मग?’ असा उलट सवाल तिला विचारण्यात आला. शेवटी तिच्या प्रियकरावर एका आठवड्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, त्यानंतर कृपाच्या त्रासात भर पडून महाविद्यालयाचे शेवटचे वर्ष तिला प्रचंड तणावाखाली आणि अपमान सहन करून काढावे लागल्याचे तिने फेसबुक पोस्टवर म्हटले आहे.‘महिला विकास कक्षात विद्यार्थ्यांचा समावेश हवा’मला झेव्हिअर्सच्या महिला विकास कक्षाची लाज वाटत असून, असे कक्ष काही कामाचे नसल्याची प्रतिक्रिया कृपाने दिली. अशा समित्यांमध्ये खरेतर विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची गरज आहे. आजचे विद्यार्थी स्मार्ट असून, त्यांचे विषय ते स्वत: चांगले हाताळू शकतात. त्यामुळे यात विद्यार्थी समावेशित करणे गरजेचे असल्याचेही मत कृपाने व्यक्त केले आहे. दरम्यान, या विषयासंदर्भात झेविअर्सच्या प्राचार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
#MeToo : सेंट झेव्हिअर्सच्या माजी विद्यार्थिनीची लैंगिक शोषणाची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 12:50 AM