Rajasthan Crime : राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात काही लोकांनी ४० वर्षीय मजुराला रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी हल्लेखोरांनी ट्रॅक्टरने कामगाराचे पायही ट्रॅक्टर चिरडले. वनविभागाच्या जमिनीवर अवैध कब्जा करण्याच्या वादातून ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालेरा पोलीस ठाणे हद्दीतील चांदा का तालाब येथे राहणारे सुखलाल गुर्जर हे शासनाच्या ग्रामीण रोजगार योजना मनरेगा अंतर्गत मजूर म्हणून कार्यरत होते. रविवारी ते मोटारसायकलवरून घरी परतत असताना त्यांच्याच प्रतीक्षेत असलेल्या आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. माहिती मिळताच त्यांचे कुटुंबीय आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर गंभीररित्या जखमी असलेल्या सुखलाल यांना कोटा येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सुखलाल गुर्जर यांचा जंगलातील एका भूखंडावरुन गावातील काही लोकांशी वाद सुरू होता. सुमारे ७ महिन्यांपूर्वी दोन्ही बाजूंमध्ये हाणामारीदेखील झाली होती. त्यावेळी समोरच्या गटातील एका व्यक्तीचा हात फ्रॅक्चर झाला होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. गुर्जराज गुर्जर आणि भोजराज गुर्जर अशी मुख्य आरोपींची नावं असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसंच अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.