मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) बनावट वेबसाइट प्रकरणात गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली आहे. ओमकार शिंदे (२६) आणि सत्यम तिवारी (२५), अशी त्यांची नावे असून, दोघेही उच्चशिक्षित आहेत. ते ‘वन टेक मीडिया कंपनी’त वेब डेव्हलपर आणि ग्राफिक डिझायनर म्हणून कार्यरत होते.
डिलाईल रोडचा रहिवासी असलेला ओमकार बीकॉम झाला असून, तो ‘वन टेक’मध्ये ग्राफिक डिझायनर होता. तर, पालघरचा सत्यम हा वन टेकमध्ये अँड्रॉइड डेव्हलपर म्हणून कार्यरत होता. त्याने बी.टेकच्या दुसऱ्या वर्षात ड्रॉप घेतला आहे. यापूर्वी गुन्हे शाखेने कल्पेश सेवक आणि अमोल पटेल या दोघांना अटक केली. म्हाडाचे हुबेहूब मात्र बनावट संकेतस्थळ तयार करून त्याद्वारे नागरिकांच्या फसवणुकीचा डाव मांडणाऱ्या आरोपींपैकी अमोल पटेल (सावंत) हा शिक्षक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
म्हाडाचे बनावट संकेतस्थळ बनवणाऱ्या मुख्य आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. अटक केलेल्या अमोल याच्यावर म्हाडाचा अधिकारी असल्याचे भासवून बनावट संकेतस्थळावर घरासाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्याची जबाबदारी होती. तर नागरिकांना फसवून घेतलेली अनामत रक्कम आणि पुढील व्यवहारातून येणारे पैसे स्वीकारण्यासाठी कल्पेश सेवक याच्या बँक खात्याचा वापर होणार होता. या टोळीने म्हाडातील दलालांशी संपर्क साधून लॉटरीद्वारे घर घेणाऱ्या नागरिकांना आपल्यापर्यंत आणण्यास सांगितले होते.
बनावट संकेतस्थळावर अर्ज करणाऱ्या नागरिकांशी ही टोळी स्वतः संपर्क साधत होती. या आरोपींच्या सांगण्यावरून ओमकार आणि सत्यमने ही वेबसाईट बनवून दिली होती. याप्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.