मुंबई - म्हाडाचे कंत्राटदार यांच्या बोलाची रक्कम मंजूर करण्यासाठी म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याने २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) चंदनवाडी सी- ३ विभाग कार्यालय येथे रंगेहाथ अटक केली आहे. या लाचखोर म्हाडा कार्यकारी अभियंत्याचे नाव सूर्यकांत शंकरराव देशमुख (वय ५५) असं आहे .
तक्रारदार असलेल्या म्हाडाचे कंत्राटदार यांना सोनापूर एम. एस. लेन येथील सेस इमारतींचे दुरुस्तीच्या कामाचे ८ लाखांचे कंत्राट मिळाले होते. दुरुस्तीनंतर कामाचे ८ लाख रुपये मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता सूर्यकांत देशमुखने कंत्राटदाराकडे ८ लाख बिलाचे २ टक्केप्रमाणे १६ हजार आणि व्हिजिलन्सचे ५ हजार रुपये अशी एकूण २१ हजार लाचेची त्यानंतर तडजोडीअंती २० हजार लाचेची रक्कम ठरली. ठरलेली लाचेची रक्कम तक्रादाराला एका खाजगी कंत्राटदाराकडे देण्यास सांगितली. काल याबाबत तक्रारदार कंत्राटदाराने एसीबीला माहिती दिली. त्यानुसार आज एसीबीने चंदनवाडी येथील म्हाडाच्या सी ३ विभाग कार्यालय येथे सापळा रचला आणि खाजगी इसमाकरवी लाच स्वीकारताना देशमुखला अटक केली.