शिर्डी (जि. अहमदनगर) : कौटुंबिक वादातून जावयाने चुलत भावाच्या मदतीने सासुरवाडीवर हल्ला करून मेहुणा, पत्नी व आजेसासूची धारदार शस्त्राने हत्या केली. तर कुटुंबातील तिघे गंभीर जखमी आहेत. बुधवारी मध्यरात्रीच्या या तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पत्नी व सासुरवाडीतील लोकांशी असलेल्या वादाचा राग मनात धरून संगमनेर येथील सुरेश विलास निकम (३२) व त्याचा चुलत भाऊ रोशन कैलास निकम (२४) हे दोघे मोटारसायकलवरून सावळीविहीर येथे सुरेशच्या सासुरवाडीला आले. दार वाजवल्यानंतर सुरेशच्या आजेसासू हिराबाई गायकवाड यांनी दरवाजा उघडताच त्यांच्यावर आरोपींनी प्रथम चाकूहल्ला केला. यानंतर आवाजाने जागे झालेल्या कुटुंबातील अन्य सदस्यांवरही आरोपींनी बेफाम चाकूहल्ला केला. मदतीला आलेल्या शेजाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून आरोपी पसार झाले.
अन् टोलनाक्यावर सापडले तावडीत आरोपी सुरेश निकम व रोशन निकम हे दुचाकीवरून नाशिकरोडला येऊन रेल्वेने परराज्यात पळून जाणार असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास शिंदे टोलनाका येथे सापळा रचला. सिन्नरकडून नाशिकरोडकडे नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून दोघे जण येत होते. पोलिसांना बघताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी टोलनाक्याजवळ शिताफीने त्या दोघांना बेड्या ठोकल्या.
या घटनेत आरोपीचा मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड (२५), पत्नी वर्षा सुरेश निकम (२४) व आजेसासू हिराबाई गायकवाड (७०) यांचा मृत्यू झाला. तर, आरोपीची सासू संगीता चांगदेव गायकवाड (४५), सासरे चांगदेव गायकवाड (५५) व मेहुणी योगिता महेंद्र जाधव (३०) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चार पथकांकडून शोध : पोलिस अधीक्षक राकेश ओला व अपर अधीक्षक स्वाती भोर, उपअधिक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक सोपान शिरसाट तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तातडीने चार पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.