मुंबई : घरबसल्या पेन्सिल पॅकिंग करून हजारो रुपये कमवा अशी जाहिरात बऱ्याचदा फेसबुकवर आपण पाहिली असेल. नामांकित कंपन्यांच्या पेन्सिल बॉक्समध्ये भरून त्यामार्फत नफा देण्याच्या आमिषाला वांद्रेतील एक ऑटो मेकॅनिक फसला आणि त्याच्या खात्यातून लाखभर रुपये काढून घेण्यात आले.
तक्रारदार सोहेल बेग (२५) हा शिवडीमध्ये खाजगी कंपनीत मेकॅनिक म्हणून काम करतो. मात्र, गेले सहा महिने त्याला नोकरी नसल्याने सध्या लग्नाच्या डेकोरेशनची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. बेगने १ मे रोजी मोबाइल पाहत असताना त्याला पेन्सिल पॅकिंगचे काम घरबसल्या करून महिन्याला ३० हजार रुपये आणि त्यातही १५ हजार ॲडव्हान्स मिळतील, अशी जाहिरात पाहिली. त्याचवेळी त्याला व्हाॅट्सॲप क्रमांकावरून फोन आला व कामाची माहिती देणारा रेकॉर्डेड ऑडिओही पाठविला. यूपीआय आयडी आणि स्कॅनर पाठवत त्यावर ६०० व २० रुपये भरण्यास सांगितले जे गुगल पे मार्फत बेगने भरले व त्याला एक आयडेंटिटी कार्ड पाठवले गेले.
आयकार्ड आणि डिलिव्हरी बॉयनटराज पेन्सिल कंपनी, बेगचे नाव, जन्मतारीख, लिंग, जॉयनिंग डेट आणि रोल अशी माहिती भरलेले आयडेंटिटी कार्ड पाठविले. त्यानंतर एका व्यक्तीने फोन केला जो डिलिव्हरी बॉय असून १५ दिवसांचे पेन्सिल मटेरियल आणि एकूण भरलेले १६ हजार २२० रुपये आणल्याचे त्याने सांगितले. मात्र, त्याआधी आयकार्डचे ३ हजार १५० रुपये भरण्यास सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर बेगच्या घरापासून तो अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर असल्याचेही कथित डिलिव्हरी बॉयने सांगितल्याने बेगने ते पैसे भरले. पुढे डिलिव्हरीला उशीर झाल्याने अजून ३ हजार १०० रुपये मागत हे सर्व पैसे तुम्हाला आम्ही परत पाठवणार असे सांगितले. एकंदरच या ना त्या कारणाने बेगकडून त्यांनी ९४ हजार ४१९ रुपये वेगवेगळ्या यूपीआय आयडीमार्फत घेत त्याची फसवणूक केली आणि त्याने वांद्रे पोलिसात धाव घेतली.