गंगाखेड (परभणी ) : बनावट सातबारा उतारे तयार करून त्याआधारे लाखो रुपयांचा पिकविमा उचला असल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी तालुक्यातील इरळद येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांविरुद्ध तलाठी रमेश भराड यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी (दि. २४ ) रात्री गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पिकविमा रकमेनुसार शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्र तपासुन अहवाल सादर करण्याचे आदेश दि. २१ जुलै २०१८ रोजीच्या पत्रान्वये जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिले होते. यानुसार नरळद सज्जाचे तलाठी रमेश दत्तराव भराड यांनी पिकविम्याचा लाभ घेणाऱ्या इरळद येथील शेतकऱ्यांच्या शेत क्षेत्राची तपासणी केली. यावेळी १) छायाबाई शंकर खजे गट क्रमांक ३२, पिकविमा रक्कम २२०४०० रु. २) प्रणित शंकर खजे गट क्रमांक ३३, पिकविमा रक्कम १७३६६५ रु. ३) प्रज्ञा शंकर खजे गट क्रमांक ३४, पिकविमा रक्कम १५५१६ रु. ४) प्रशांत शंकर खजे गट क्रमांक ३५, पिकविमा रक्कम २१३९६ रु. ५) माधव रावजी खजे गट क्रमांक २५, पिकविमा रक्कम १६९५३८ रु. ६) शेषाबाई माधव खजे गट क्रमांक २६, पिकविमा रक्कम २०५२४१ रु. ७) राम माधवराव खजे गट क्रमांक २७, पिकविमा रक्कम ५९००० रु. ८) शिवकांता राम खजे, गट क्रमांक २८, पिकविमा रक्कम १८३३७ रु. ९) विष्णु माधवराव खजे गट क्रमांक २९, पिकविमा रक्कम २९५०० रुपये याप्रमाणे वरील नऊ जणांनी नमुद केलेल्या शेत गटाच्या अभिलेखात त्यांची नावे आढळुन आली नाहीत.
या सर्वांनी साल सन २०१७ मध्ये पिकविमा भरतांना इरळद येथील शेत सर्व्हे क्रमांक ३२, ३३, ३४, ३५, २५, २६, २७, २८ व २९ या गटात त्यांच्या नावे शेती नसतांनाही बनावट सही शिक्क्याने सातबारा व होल्डींग प्रमाणपत्र तयार करुन पिकविमा भरला व ( ९,१२,५९३ ) नऊ लाख बारा हजार पाचशे त्र्यांनव रुपयांचा अपहार करत शासनाची फसवणुक केल्याचे सिध्द झाले. याप्रकरणी तहसीलदार जिवराज डापकर यांनी दिलेल्या आदेशावरून तलाठी रमेश भराड यांनी मंगळवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास सपोनि राजेश राठोड, पोशि ओम वाघ करत आहेत.