किनगाव (जि. लातूर ) : हुंड्यासाठी करण्यात आलेल्या मारहाणीत एका २१ वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील विजयनगर तांडा-खंडाळी येथे १७ एप्रिल २०२१ राेजी घडली. दरम्यान, याप्रकरणी संजय माेहन राठाेड यांनी अहमदपूर न्यायालयात धाव घेत दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशानुसार किनगाव पाेलीस ठाण्यात साेमवारी आठ जणांविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने अहमदपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.पाेलिसांनी सांगितले, परभणी जिल्ह्यातील पिराचा तांडा-माेजमाबाद (ता. पालम) येथील काेमल (२१) हिचा विवाह अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील विजयनगर तांडा येथील सुनील गाेविंद जाधव (२५) याच्याशी २०२० मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नामध्ये लग्न खर्च म्हणून ३ लाख ५० हजार रुपये, दाेन ताेळे साेन्याचे दागिने, संसाराेपयाेगी साहित्य देण्यात आले हाेते. काही दिवस काेमलला सुखाने नांदविण्यात आले. मात्र, नंतर तुझ्या माहेरहून हुंडा कमी मिळाला आहे. दुकान टाकण्यासाठी आणखी ५० हजार रुपये घेवून ये, म्हणून तिचा सतत शाररीक, मानसिक छळ सुरु केला. तिला वारंवार शिवीगाळ करुन मारहाण करण्यात येत हाेती. दरम्यान, ती गर्भवती असताना तिला धमक्या देत छळ सुुरुच हाेता. पैशाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या मारहाणीत गर्भवती काेमलचा मृत्यू झाला. ही घटना १७ एप्रिल २०२१ राेजी घडली. तर विवाहितेच्या माहेरच्या मंडळींना घरी जावून तुम्ही कुठे तक्रार केली तर तुम्हालाही ठार मारु अशी धमकी देण्यात आली. याबाबत विवाहितेच्या माहेरच्यांनी अहमदपूर न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत कलम १५६ (३) सीआरपीसी प्रमाणे गुन्हा नाेंद करण्याबाबत आदेश दिले.न्यायालयाच्या आदेशानुसार संजय माेहन राठाेड (४२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सुनील गोविंद जाधव, गोविंद शिवलाला जाधव, सखुबाई गोविंद जाधव, पारूबाई उत्तम जाधव, शिवाजी तुळशीराम जाधव, सुभाष तुळशीराम जाधव, शानुबाई सुभाष जाधव (सर्व रा. विजयनगर तांडा-खंडाळी) तर अनिल रुस्तम राठोड, शाहूबाई अनिल राठोड (दोघे रा. पिराचा तांडा मोजमाबाद ता. पालम, जि. परभणी) यांच्याविरुद्ध गुरनं. २३३ / २०२१ कलम ३०२ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलीस निरीक्षक एस.जी. बंकवाड करीत आहेत.
मन सुन्न करणारी घटना! हुंड्यासाठी मारहाण; गर्भवती महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 7:15 PM
Dowry Death : अहमदपूर तालुक्यातील घटना : न्यायालयाच्या आदेशानुसार खुनाचा गुन्हा
ठळक मुद्देन्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत कलम १५६ (३) सीआरपीसी प्रमाणे गुन्हा नाेंद करण्याबाबत आदेश दिले.