मुंबई : गोरेगावमध्ये चांगला परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत स्टॅम्प पेपरचे कलर झेरॉक्स काढत त्यावर पैशाच्या व्यवहाराचा करार करून ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आल्यावर पोलिसांनी नामांकित किराणा स्टोअर नूतन दालमील याचा मालक केतन बाबूभाई रांभीया याला अटक केली. त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात फसलेल्या लोकांनी याला ‘मिनी तेलगी’ घोटाळ्याचे नाव दिले आहे.
गोरेगावच्या एम. जी. रोडवर नूतन दालमिल नावाने किराणा मालाचे दुकान आहे. तक्रारदार अनिता कडेचा या मंडप डेकोरेटर असून, त्यांची मैत्रीण वंदना पटेल आणि मनीष यांच्यामार्फत रांभीया याच्याशी जानेवारी, २०१९ मध्ये त्यांची ओळख झाली. त्या दुकानात किराणा खरेदीसाठी जायच्या. त्यावेळी रांभीया याने त्याचा व्यवसाय वाढविण्यासाठी पैशांची गरज असून, कडेचा यांना त्याच्याकडे पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. त्यासाठी वर्षाला १५ टक्के परताव्याचेही आमिष दिले.
एप्रिल, २०१९ मध्ये कडेचा यांनी ५० हजाराचा धनादेश रांभीया याला दिला. त्याची पावती मागितल्यावर ती नंतर देतो, असे त्याने सांगितले. जून, २०१९ मध्ये कडेचा याना रांभीया याने बॉण्ड पेपरवर घेतलेली रक्कम आणि त्यावर १५ टक्के परतावा देईन, असे लिहून सही करत तो पेपर त्यांना दिला. त्यानुसार २०२२ पर्यंत ४१ लाख ५० हजार रांभीया याने कडेचा यांच्याकडून घेतले. त्यांनी जेव्हाही पैशांची मागणी केली तेव्हा पैसे नाहीत किंवा परताव्याचे टक्के वाढवतो, असे सांगितले. मात्र परतावा दिलाच नाही.
...ही तर सरकारचीही फसवणूक‘बोगस स्टॅम्प पेपर वापरून माझ्या अशिलाकडून लाखो रुपये उकळण्यात आले. ही फक्त त्याचीच नाही, तर एकप्रकारे सरकारचीही फसवणूक आहे. त्यानुसार याविरोधात आम्ही अखेरपर्यंत लढा देणार आहोत. - ॲड. महेश राजपोपट, तक्रारदाराचे वकील
...आणि बिंग फुटले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक स्टॅम्प पेपरला स्वतःचा असा एक युनिक क्रमांक आणि वॉटरमार्क असतो. सप्टेंबर, २०२१ रोजी जेव्हा कडेचा यांनी रांभीया याने त्यांना दिलेले सहा बॉण्ड पेपर बारकाईने पाहिले, त्यावेळी त्यांना सगळ्यांवर ३३४१८४ हा एकच युनिक क्रमांक दिसला. याबाबत त्यांनी रांभीया याला याबाबत विचारणा केली. ज्यावर भेटून बोलू, असे तो म्हणाला. अखेर कडेचा यांनी याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रांभीया याच्याविरोधात फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केल्यावर गुरुवारी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी गोरेगाव पोलीस चौकशी करत आहेत.