बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : हरयाणात खाणमाफियाने पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) सुरेंद्र सिंह मांजू यांना अंगावर डम्पर- ट्रक घालून ठार मारल्याची खळबळजनक घटना नूंह जिल्ह्यात समोर आली. एका गावात सुरेंद्र सिंह यांनी अवैध खाणकामावर धाड टाकल्यानंतर खाणमाफियासंबंधित लोकांनी त्यांच्या अंगावर डम्पर घातला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोर डम्पर सोडून पळून गेले.
पंचगावच्या डोंगरी भागात अवैध खोदकाम सुरू आहे. ज्यावेळी सुरेंद्र सिंह यांनी धाड टाकली तेव्हा ते आपल्या वाहनाशेजारी उभे होते. त्यांनी डम्पर-ट्रक चालकाला थांबण्याचा इशारा केला होता. मात्र, चालकाने डम्पर-ट्रक रोखण्याऐवजी त्यांच्या अंगावर घातला. डीएसपींचा चालक आणि सुरक्षारक्षकाने रस्त्याच्या बाजूला उडी घेत जीव वाचवला.
कुटुंबीयांना एक कोटी
डीएसपी सुरेंद्र सिंह यांना हरयाणा सरकारने शहिदाचा दर्जा दिला आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येईल. अवैध खाण माफियांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. डीएसपी सिंह हे तीन महिन्यांनी निवृत्त होणार होते.
डम्पर चालक जखमी?
या दुर्घटनेनंतर काही वेळात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत एक व्यक्ती जखमी झाली. तो डीसीपींच्या अंगावर डम्पर घालणारा चालक असल्याचे सांगितले जाते.