नवी दिल्ली - नोएडाच्या सेक्टर २५ मध्ये दोन अल्पवयीन मुलांना चोरीच्या आरोपाखाली भर उन्हात वीजेच्या खांबाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात रिक्षाचालकांनी या दोन मुलांना निर्वस्त्र करून मारहाण केली. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे.
काल नोएडा येथे दोन अल्पवयीन मुलांना निर्वस्त्र करून मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ वायरल झाला. नोएडातील रिक्षा स्टँडवरील काही रिक्षांच्या गुरुवारी बॅटरी चोरीला गेल्या होत्या. काल या परिसरात पीडित मुलांना रिक्षाचालकांनी बॅटरी चोरीच्या संशयातून पकडले. तसेच दोघांनाही पकडून विजेच्या खांबाला बांधले आणि निर्वस्त्र करून बेदम मारहाण केली. कडक उन्हात ही मुलं मदतीसाठी हात मागत होती. मात्र, रिक्षाचालक त्यांना निर्दयपणे मारहाण करत होते. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन तपास सुरू केला आहेत. निर्दयीपणे मारहाण केलेल्या अल्पवयीन मुलांची ओळख पटवण्याचे आणि त्यांना मारहाण करणारे रिक्षाचालक कोण आहेत? याचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.