वसई: एका अल्पवयीन मुलीला हापूस आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार वसई पूर्व स्थित समर्थ रामदास नगरात घडला असल्याचे रविवारी उघडकीस आले आहे.या संदर्भात माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी नराधमाच्या मुसक्या आवळून त्याच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 354 अन्वये व बालकांचे लैगिक शोषण अत्याचार कायदा 2012 चे कलम 8,10 आणि 12 प्रमाणे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करीत त्यास अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी नवघर पूर्व येथील रहिवासी असून घरातील लागणाऱ्या वस्तूसाठी तीचे अधून मधून दुकानात येणे जाणे असल्याने 55 वर्षाच्या आरोपीची नजर या पीडित मुलीवर आधीच पडली होती. मागील आठ दिवस झाले तो या मुलीला हापूस आंबे देण्याच्या बहाण्याने हेरायच्या तयारीत होता, अखेर शनिवारी या नराधमाने या पीडित मुलीला हापूस आंबा देतो असे आमिष सांगून स्वतःच्या दुकानात नेऊन तिथे तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन करून तिच्यावर अतिप्रसंग केला.दरम्यान घडल्या प्रकाराची करुण कहाणी पीडित मुलीने आपल्या आईला सांगितली असता व्यथित झालेल्या पीडित मुलीच्या आई-वडिलांनी थेट माणिकपूर पोलीस ठाणे गाठून त्या नराधमाने केलेल्या कृत्याचा पाढाच पोलिसांसमोर वाचून त्याआरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा नोंद करुन त्यास अटक केली असता त्या आरोपीला कोर्टात हजर केलं असता मात्र कोर्टाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमतला दिली.
या संदर्भात माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत लॉकडाऊन काळातदेखील लहान मुलींवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पालकवर्गाकडून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे