पुणे : मॉलमध्ये चांगल्या पगाराची नोकरी आणि पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी बुलढाणा येथून एक अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला पुण्यात आणणाऱ्या दाम्पत्याला हडपसर पोलिसांनीअटक केली.दिलीप सखाराम पवार व त्यांची पत्नी अरुणा (रा. पोखरी, ता. जि़. बुलढाणा)अशी अटक केलेल्याची नावे आहेत.पीडित मुलगी ही पवार यांची नातेवाईक आहे़ दोघांनी पैसे कमविण्याच्या उद्देशाने मुलीला जबरदस्ती करत तिच्या मनाविरुद्ध वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे़. आरोपी महिला ही शहरातील एका नामांकित मॉलमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती. तिचा पती बांधकाम व्यावसायात काम करतो. त्यांनी पीडित मुलीच्या घरच्यांना तिला पुण्यात चांगली नोकरी लावतो, असे सांगितले. मात्र,दोघांबद्दल तिच्या आईवडिलांना शंका असल्याने त्यांनी नकार दिला होता. तरीही या दोघांनी मुलीला फुस लावून परस्पर मुलीला पुण्यात आणले होते.बुलढाणा पोलिसांकडून याची माहिती मिळाल्यावर हडपसर पोलिसांनी तब्बल तीन दिवस संपूर्ण परिसरात शोध घेतला. मांजरी येथे एका ठिकाणी पवार थांबला असल्याचे समजल्यावर सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण व त्यांच्या पथकाने पवार दाम्पत्याला पकडले व अधिक तपासासाठी दोघांना बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायासाठी आणले पळून; बुलढाण्यातील दाम्पत्याला पुण्यात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 8:39 PM