लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकतर्फी प्रेमसंबंधातून मारहाण करून अल्पवयीन विद्यार्थिनीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या युवक आणि त्याच्या भावाविरुद्ध हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.आकाश जनार्धन राठोड (२२) आणि त्याचा भाऊ प्रकाश राठोड (१९) रा. मोहगाव झिल्पी अशी आरोपींची नावे आहेत. मोहगाव झिल्पी, हिंगणा येथील बाराव्या वर्गात असलेल्या १७ वर्षाच्या विद्यार्थिनीने २४ डिसेंबरला विहिरीत उडी मारून जीव दिला होता. घराशेजारील सार्वजनिक विहिरीत मृतदेह आढळल्यानंतर या घटनेची माहिती मिळाली होती. त्यानंतर विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमातून मारहाण केल्याची चर्चा होती. हिंगणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला. यात राठोड बांधवांचा हात असल्याची माहिती समोर आली. विद्यार्थिनीची काही दिवसांपूर्वी आकाशसोबत ओळख झाली होती. आकाश तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. तो तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. परंतु तिने मनाई केली. त्यामुळे तो चिडला होता. त्याने अनेकदा तिला धमकी दिली. विद्यार्थिनीची आई मजुरी करते. तिला पाच बहिणी आहेत. आईवर बहिणींची जबाबदारी असल्यामुळे विद्यार्थिनीने आकाशच्या धमकीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आकाशची हिंमत वाढली. २३ डिसेंबरला आकाश तिच्या शाळेत गेला. तेथे तिला लग्नासाठी हट्ट धरला. मनाई केली असता त्याने तिला मारहाण केली. आकाशने या विद्यार्थिनीच्या भूमिकेची आपला भाऊ प्रकाशला माहिती दिली होती. २४ डिसेंबरला प्रकाश तिच्या शाळेत गेला. त्याने माझ्या भावाशी लग्न करण्यास मनाई का केली अशी विचारणा करून विद्यार्थिनीला मारहाण करणे सुरू केले. त्याने तिला शिवीगाळ करून तिचा अपमान केला. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. विद्यार्थिनीच्या आईनेही चौकशीत ही माहिती दिली. त्या आधारावर पोलिसांनी आकाश आणि त्याचा भाऊ प्रकाश विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच दोन्ही भाऊ फरार झाले आहेत.
नागपुरात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 8:24 PM
एकतर्फी प्रेमसंबंधातून मारहाण करून अल्पवयीन विद्यार्थिनीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या युवक आणि त्याच्या भावाविरुद्ध हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देयुवक आणि त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल