- पूनम अपराजमुंबई : चोरट्यांकडून महिलांना जास्त टार्गेट केले जाते. कारण मोबईल किंवा मंगळसूत्र हिसकावल्यानंतर प्रतिकार किंवा पाठलाग होण्याची शक्यता कमीच असते. ही क्लुप्तीच एका अल्पवयीन चोरट्याच्या अंगलट आली आहे. या चोरट्याने साध्या वेशात घरी जात असलेल्या महिला पोलिसाचाच मोबाईल हिसकावला आणि पळ काढला. मात्र, सतर्क झालेल्या महिला पोलिसामुळे चोरटा सापडला आणि गजाआड गेला.
ताडदेव पोलिस ठाण्याचा हद्दीत ही घटना घडली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस शिपाई अक्षता आजगेकर या कर्तव्य बजावून घरी जात होत्या. मुंबई सेंट्रल पुलावरून ताडदेव येथील पोलीस वसाहतीच्या दिशेने मोबाईलवर बोलत पायी जात होत्या. एवढ्यात मागून आलेल्या अल्पवयीन मुलाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावत धूम ठोकली. या चोरट्याला महिला आहे, ती काय करणार असा विश्वास होता. मात्र, पुढे झाले ते त्याला गजाआड करण्यास पुरेसे ठरले.
मोबाईल हिसकावल्याची जाणीव होताच आजगेकर यांनी सावध होत आरडाओरडा करत त्या चोरट्याचा पाठलाग सुरू केला. यामुळे तेथेच जवळपास असलेल्या दोघांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनीही या चोरट्याचा पाठलाग करत पकडले. संतोष वानखेडे आणि पोलीस अंमलदार पुरी यांनी या चोरट्यास पकडले आणि ताडदेव पोलीस ठाण्यात आणले.
मोबाईल पळवणाऱ्या अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून महिला पोलिसाने त्याला ताब्यात घेतले. कर्तव्य बजावून घरी जाताना सदर घटना महिला पोलिसासोबत घडली. या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी नोंद करून 16 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या 16 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल केला असून बालसुधारगृहात हलविले आहे.