ठाणे: एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक न करण्यासाठी दहा लाखांची मागणी करून नंतर ती अडीच लाखांवर तडजोड करून ५० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मीरा रोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले आणि प्रकाश कांबळे यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती एसीबीने दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील एका तक्रारदाराविरुद्ध शहाबुद्दीन पठाण यांनी फसवणुकीबाबत केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी मीरा रोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले (३२, रा. मीरा रोड, ठाणे) हे करीत होते. त्याच अर्जाच्या अनुषंगाने तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यात त्यांना अटक करू नये, यासाठी एकीलवाले यांनी तक्रारदाराकडे तब्बल दहा लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यासाठी उपनिरीक्षक प्रकाश कांबळे यांनीही त्यांना प्रोत्साहित केल्याची तक्रार २ नोव्हेंबर २०२१ रोजी ठाणे एसीबीकडे तक्रार दाखल झाली होती.
याच तक्रारीच्या अनुषंगाने ३ नोव्हेंबर रोजी एसीबीने याची पडताळणी केली. तेव्हा एकीलवाले यांनी तक्रारदाराकडे रक्कम न सांगता लाचेची मागणी केली. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी पुन्हा एसीबीने पडताळणी केली. त्यावेळी तक्रारदाराकडे पुन्हा अडीच लाखांची मागणी केली. त्यावेळी उपनिरीक्षक कांबळे यांनीही ही लाचेची रक्कम देण्यासाठी प्रोत्साहित करून ती २९ नोव्हेंबर रोजी स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्याच आधारे २९ नोव्हेंबर रोजी मीरा रोड पोलीस ठाण्यात एसीबीच्या पथकाने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाब उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला.
त्यावेळी एकीलवाले यांनी तक्रारदाराला त्यांच्या खासगी वाहनाने पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर नेले. तिथे त्यांच्याकडून ५० हजारांची रक्कम स्वीकारली. ती त्यांचा हस्तक सुकेश कोटीयन उर्फ अण्णा यांच्याकडे देऊन ते दोघेही पसार झाले. त्यानंतर यातील कथित आरोपी उपनिरीक्षक एकीलवाले यांना ठाण्याच्या कोर्टनाका येथील पॅव्हिलियन हॉटेल येथून तर उपनिरीक्षक कांबळे यांना मीरा रोड येथील त्यांच्या घरातून ताब्यात घेले.
तर त्यांचा तिसरा साथीदार खासगी व्यक्ती मुकेश उर्फ अण्णा याचा मात्र शोध सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे या दोघांच्या अटकेची प्रक्रिया देखील उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.