लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: येथील शांतीपार्क मधील एका इमारतीच्या जिन्यावर आढळून आलेल्या तरुणाच्या मृतदेह प्रकरणी ती हत्या नसून आत्महत्या असल्याचे पोलिसांनी अधिकृतरित्या स्पष्ट केले आहे. रेखा रिट्रीट इमारतीमध्ये मामाकडे राहणारा आर्यन सिंह ह्याचा मृतदेह त्याच इमारतीच्या जिन्यावर रविवारी सकाळी सफाई कामगारास दिसून आला होता. या घटनेने खळबळ उडून त्याच्या मामाने हत्येचा संशय व्यक्त केला होता.
दरम्यान, पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मीरारोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल सह पोलीस अधीकारी व कर्मचारी यांनी विविध दिशेने तपास सुरु केला होता. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकास पाचारण केले होते. शिवाय गुन्हे शाखा युनिट १ चे पथक दाखल झाले होते. आर्यन याच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या गळ्यावर फास घेतल्याची खूण होती. त्याशिवाय कुठेही झटापट वा मारहाणीची खूण नव्हती . आत्महत्याच्या अनुषंगाने लक्षणे आढळून आल्याने त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
विजयसिंह बागल यांनी सांगितले की, आर्यन हा मामाच्या समोर राहणाऱ्या बाबूच्या घरी रात्री गेला होता. तेथील एका शयनगृहात त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली . त्या आधी पहाटे ५ च्या सुमारास त्याने त्याच्या आई सह मित्र मैत्रिणींना संदेश पाठवून आय एम सॉरी असे म्हटले होते. आर्यन याने आत्महत्या केल्याने घाबरलेल्या बाबू व त्याच्या मित्राने त्याचा मृतदेह बाहेर जिन्यावर आणून ठेवल्याचे चौकशीत समोर आल्याचे बागल म्हणाले.