सांगली : दुध उत्पादक सहकारी संस्था संचालक मंडळाच्या निवडणुकीतील अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या कागदपत्रे देण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना मिरज येथील दुग्धव्यवसाय विकास कार्यालयातील दुध संकलन पर्यवेक्षक तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपक श्रीपती बुरुटे (वय ४६ रा. पूर्व म्हाडा कॉलनी, स्वामी समर्थ मंदिरानजीक मिरज ) याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
घटनेची माहिती अशी की, तक्रारदार यांच्या दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवडणूक झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बुरुटे याने काम पाहिले होते. संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची कागदपत्रे देण्याकरीता बुरूटे याने तक्रारदार यांच्यांकडे एक हजाराची लाच मागितली. त्याबाबतचा तक्रारदार यांनी दि. २३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला होता.
सोमवारी बुरूटे याच्याविरूध्द मिरजेतील जिल्हा दुग्धव्यवसाय विकास कार्यालयात सापळा लावला. त्याला हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. बुरुटे याच्याविरुध्द महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस उपअधीक्षक विनायक मिलारे, निरीक्षक दत्तात्रय पुजारी, अंमलदार प्रितम चौगुले, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, रविंद्र धुमाळ, सलीम मकानदार, अजित पाटील, चंद्रकांत जाधव आदींनी केली.