भाईंदर - मीरारोड रेल्वे स्थानकाच्या हद्दीत शनिवारी रेल्वेतच खलाशीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यूनंतर रेल्वे पोलिसांनी त्याला अनोळखी (बेवारस) दाखविल्याने त्याचा मृतदेह नातेवाईकांना सक्षम कागदपत्रे दाखविल्यानंतर ताब्यात घेण्यास रविवार उजाडला. पोलिसांच्या या अजब कारभाराविरोधात मृताच्या नातेवाईकांत तीव्र नाराजी पसरली आहे.
वसई रेल्वे क्वार्टर्समध्ये राहणारा चेतन मुरलीधर मोटवानी (३३) हा पश्चिम रेल्वेत २०१० मध्ये खलाशी पदावर रुजू झाला होता. तत्पुर्वी त्याचे वडील चर्चगेट येथील कार्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांचा कर्करोगाने मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर चेतनला रेल्वे प्रशासनाने नोकरी दिली होती. शनिवारी तो वसईहून बोरीवली येथे चर्चगेट लोकलने कार्यालयीन कामासाठी जात असताना दुपारी ३ वाजताच्या सुमारास मीरारोड ते दहिसर दरम्यान तो धावत्या लोकलमधून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मीरारोड रेल्वे पोलिसांनी चेतनचा मृतदेह मीरारोड रेल्वे स्थानकात आणला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ पश्चिम रेल्वेचे ओळखपत्र आढळून आले. यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. हे सोपस्कार पाडूनही पोलिसांनी त्याच्या शवविच्छेदनपुर्व अर्जात चेतन अनोळखी असल्याची माहिती नोंद केली. दरम्यान चेतनची आई धन्वतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता मीरारोड रेल्वे पोलिस चौकीत दाखल झाली. यानंतर तब्बल तीन तासानंतर चेतनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भार्इंदर पश्चिमेकडील भारतरत्न स्व. पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदन केंद्रात २४ तास डॉक्टरांना उपस्थित राहण्याचे निर्देश असतानाही ते उपस्थित नसल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. रात्री ८ वाजेपर्यंत चेतनची आई केंद्रात त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी हजर असताना तीला दुसय््राा दिवशी येण्यास सांगण्यात आले. रविवारी चेतनची आई व भाऊ करन त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले असता अर्जातील ‘अनोळखी’ नोंदीमुळे तो त्यांच्या ताब्यात देण्यात आला नाही. त्यासाठी चेतनचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणण्याचे फर्मान सोडण्यात आले. ते दाखविल्यानंतर रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास चेनतचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघातावेळी पुरावा सापडूनही चेतनचा अनोळखी म्हणून नोंद करणाऱ्या पोलिसांच्या या प्रतापी कारभारावर त्याच्या नातेवाईकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
*चेतनच्या अपघाती मृत्यूची पोलिसांनी अनोळखी म्हणुन नोंद केल्याने त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आम्हाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. सुरूवातीला पोलिसांकडून प्रतिसाद दिला जात नव्हता. परंतु, स्थानिक समाजसेवक अनिल नोटीयाल यांच्या प्रयत्नामुळे २४ तासानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.
- करन मोटवानी, मृत चेतनचा भाऊ
*चेनतची अनोळखी नोंद चुकीने झाली असून यापुढे अशी चुक होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.
- मीरारोड रेल्वे पोलीस