नरेंद्र पाटील
भुसावळ (जि. जळगाव): शासकीय गोदामातील सात लाखांच्या धान्याच्या अपहारप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी तसेच चार तहसीलदार व गोदाम व्यवस्थापक अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय धान्य गोदामात गहू, साखर, ज्वारीचा ३९१ क्विंटलचा अपहार झाला होता. याची किंमत ७ लाख २७ हजार रुपये आहे. या प्रकरणी भुसावळचे तत्कालीन प्रांताधिकारी कुमार चिंचकर, तत्कालीन तहसीलदार विशाल नाईकवाडे, तत्कालीन तहसीलदार भाऊसाहेब थोरात, बोदवड येथील तत्कालीन तहसीलदार रवींद्र जोगी, प्रभारी तहसीलदार एस. यु. तायडे आणि तत्कालीन गोदाम व्यवस्थापक आर.एल. राठोड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शहर पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री उशिराने अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
याबाबत ॲड. आशिष प्रमोद गिरी (रा. काळा घोडा, मुंबई) यांनी न्यायालयात फिर्याद दिली होती. ही फिर्याद न्यायालयाकडून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय कंखरे पुढील तपास करीत आहेत.