मध्य प्रदेशच्या गुना येथील कुम्हारी गावात चोरीच्या एका मोठ्या घटनेने पोलीस चक्रावून गेले आहेत. शेतकऱ्याच्या घरातून 2 क्विंटल वजनाची तिजोरी चोरट्यांनी पळवून नेली. हा प्रकार पहिल्यांदाच घडला नसून यापूर्वीही गावातील अन्य शेतकऱ्यांच्या घरातून चोरट्यांनी तिजोरी चोरली होती.
रात्री 7-8 चोरट्यांनी घरात घुसून चोरी केली. शेतकऱ्याच्या घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी चोरट्यांनी तोंड झाकले होते. घरात घुसून शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना खोलीत बंद केलं. त्यांनी दुसऱ्या खोलीत ठेवलेली दोन क्विंटल वजनाची तिजोरी उचलून सोबत नेली. चोरट्यांनी शेतकऱ्याची मोटारसायकलही चोरली आणि तिजोरी घेऊन पळ काढला.
शेतकरी गोमदा बंजारा यांची दोन मुलं अमेरिका आणि युक्रेनमध्ये राहतात. धाकटा मुलगा गावात राहतो आणि शेती करतो. ही घटना घडली तेव्हा शेतकऱ्याची पत्नी, मुलगा आणि सून घरात झोपले होते.
कुम्हारी गावातील शेतकरी गोमदा बंजारा यांनी नुकताच मका विकला होता. त्यांना 3.82 लाख रुपये रोख मिळाले. त्यांनी आपले सर्व पैसे, सोन्याचे दागिने, एक किलो चांदी तिजोरीत ठेवली होती.,फतेहगड पोलीस ठाण्याचे प्रभारी गोपाल चौबे यांनी सांगितलं की, चोरीची मोटारसायकल 1 किमी अंतरावरून जप्त करण्यात आली आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. गोमदा बंजारा यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.